Mosambi Farming : ढोरकीनसह परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या दुहेरी संकट उभे राहिले आहे. एकीकडे हवामानातील अनियमिततेमुळे मोसंबीच्या झाडांवर अकाली फळगळती सुरू झाली असून दुसरीकडे बाजारात दर घसरल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. (Mosambi Farming)
यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. कृषी विभागाचे मार्गदर्शन तोकडे असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. (Mosambi Farming)
हवामान बदलाचा फटका : मृगबहर संकटात
ढोरकीन, वाहेगाव, बालानगर, वडाळा, पाचलगाव, रहाटगाव, कारकीन, दिन्नापूर, धूपखेडा, बोरगाव, टाकळी, लोहगाव, लामगव्हाण, मावसगव्हाण, ब्रह्मगव्हाण या गावांमध्ये मोसंबीच्या झाडांवरून फळे देठासकट गळून पडत आहेत. फळांच्या पोषणात व्यत्यय आल्याने झाडे फळे धरून ठेवू शकत नाहीत, हे चित्र आहे.
खर्च झाला लाखोंचा, फळ मिळत नाही
गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मोसंबीची बाग वाचवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला. नियमित फवारण्या, सिंचन, खत, मजुरी यावर मोठा खर्च झाला. मात्र आता हंगामातच फळगळतीमुळे बागा ओस पडू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
बाजारात दर घसरले; आवक वाढली
गुरुवारी पाचोड येथील बाजार समितीत ५०० टन मोसंबीची आवक झाली. मात्र, अधिक आवक झाल्याने दरात घसरण झाली.
सर्वाधिक दर : २० हजार रुपये प्रति टन
सर्वात कमी दर : १४ हजार रुपये प्रति टन
सध्या किरकोळ व घाऊक बाजारात मोसंबी १५ ते २० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, या दरात त्यांच्या उत्पादन खर्चाची भरपाईही होत नाही.
फळगळती रोखण्यासाठी उपाययोजना तोकड्या
कृषी विभागाच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. वेळेवर मार्गदर्शन न मिळाल्याने अनेकांनी हताश होऊन आता उस अथवा कोरडवाहू पिके अधिक फायदेशीर वाटतात असा सूर धरला आहे.
कृषी विभागाने त्वरित हस्तक्षेप करून शास्त्रीय मार्गदर्शन करावे.
योग्य फवारणी शिफारसी करणे आवश्यक आहे.
नुकसानभरपाईचे मूल्यांकन करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले
शेतकरी म्हणतात, मोसंबीची झाडं फळे न देता मोकळी होतात, तर उसनवारी, बँकेचे कर्ज कसे फेडायचं? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
सरकारने तातडीने पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा मोठ्या प्रमाणावर मोसंबी लागवडीतून शेतकरी माघार घेतील, असा इशारा दिला जात आहे.
शेतकऱ्यांची मागणी
* शासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी
* फळगळतीवर नियंत्रणासाठी कृषी विज्ञान केंद्र, तज्ञांचा सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा
* हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थैर्य यावे
मोसंबी हे निर्यातक्षम, द्राक्षानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे फळ पीक आहे. मात्र हवामान बदल आणि असमाधानकारक बाजारभावामुळे त्याच्या भवितव्यावर संकटाचे ढग गडद झाले आहेत. वेळेवर शासनाच्या योजना आणि उपाययोजना राबविल्या नाहीत, तर मोसंबी उत्पादकतेत मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.