गडचिरोली : येथील कृषी महाविद्यालय व कृषी संशोधन केंद्राच्या (Krushi Sanshodhan Kendra) संयुक्त विद्यमाने कोटगल शेतकरी शास्त्रज्ञ मंच सभा घेण्यात आली. यावेळी पीकपद्धत वातावरणातील बदल व बाजारभाव बघता पीक पद्धती बदलणे आवश्यक असून, त्यासाठी मिश्र पीक पद्धतीचा (Mixed Farming) अवलंब अर्थजनांसाठी फायद्याचा ठरू शकतो, असा निष्कर्ष काढण्यात आला.
यांत्रिकी शेतीकडे वळणे काळाची गरज असून, पीक फवारणीसाठी बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप यंत्र व तंत्रज्ञानाचा उपयोग नक्कीच फायदेशीर राहील, असे शास्त्रज्ञ मंचाच्या टीमने चर्चेदरम्यान शेतकऱ्यांना पटवून दिले. शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे अध्यक्ष प्रभाकर लाकडे, प्रा. डॉ. प्रणाली भैसारे, राजू मुरतेली, प्रशिक देशपांडे उपस्थित होते.
फळबाग शेतीचा सल्लाफळ पीक लागवडीसासाठी संत्रा, चिकू, आंबा, पेरू, सीताफळ यासारख्या पिकांची निवड करावी, संत्र्याची घन लागवड पद्धतीने ६ बाय ३ मीटर अंतरावर (५५५ झाडे) लागवड प्रती हेक्टर करावी, असे कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. वाय. आर. युवराज खोब्रागडे यांनी सांगितले.
शेतीला जोडधंदा करावा!शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्ध व्यवसाय करावा चाऱ्याचे योग्य नियोजन करून दुधाळ जनावरांना प्रति दिवस २० किलो हिरवा चारा कुटी करून द्यावा, असे डॉ. एस. पी. रामटेके यांनी सांगितले. जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस ढासळत असून, सुपीकता वाढविणे गरजेचे आहे. जमिनीत शेणखत, कम्पोस्ट खत वापराचा सल्ला डॉ. एम. डी. येनप्रेड्डीवार यांनी दिला.
मिश्र शेतीचे अनेक फायदे
- मिश्र शेतीमुळे शेती अधिक कार्यक्षम बनते.
- मिश्र शेतीमुळे मातीची सुपीकता राखली जाते.
- यामुळे धूप कमी होते.
- मिश्र शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते.
- मिश्र शेतीमुळे पिकांच्या अवशेषांचा वापर होतो.
- मिश्र शेतीमुळे नासाडी कमी होते.
- मिश्र शेतीमुळे शेतीतून उत्पन्न वाढण्यासाठी जमीन आणि श्रम यांचा प्रभावी वापर होतो.
- मिश्र शेतीमुळे शेती संतुलित आणि उत्पादक बनते.