सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यातील धनगरवाडी येथील रोहयो योजनेतील कागदावरील विहीर प्रकरणात शासनाच्या निधीचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. (MGNREGA Well Scam)
या प्रकरणात सहायक कार्यक्रम अधिकारी व तांत्रिक सहायक यांची सेवा समाप्त करण्यात आली असून तत्कालीन गटविकास अधिकारी (बीडीओ), सहायक लेखाधिकारी, ग्रामसेवक व इतर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.
कागदावर विहीर, प्रत्यक्षात अस्तित्वच नाही
धनगरवाडी येथील शेतकरी रामचंद्र शंकर खडसे यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या शेतात कोणतेही विहिरीचे काम झाले नसताना त्यांच्या नावावर तब्बल १ लाख ७५ हजार २२४ रुपयांचे देयक काढण्यात आल्याचे उघड झाले.
विशेष म्हणजे, खडसे यांच्यासारखे अनेक शेतकरी पुढे येत आपल्या शेतातही विहीर नसताना बोगस मजुरांच्या नावे अनुदान लाटण्यात आल्याची तक्रार करत आहेत.
चौकशी समितीची प्रत्यक्ष स्थळ पाहणी
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने चौकशी समिती नेमली. २० फेब्रुवारी रोजी समितीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, संबंधित शेतात विहिरीचे साधे अस्तित्वही आढळले नाही.
प्रत्यक्ष कामाचा पत्ता नसताना देयके अदा झाल्याने हा प्रकार स्पष्टपणे शासकीय निधीचा अपहार असल्याचे प्राथमिक चौकशीत सिद्ध झाले.
कोणावर झाली कारवाई?
चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात आली:
सहायक कार्यक्रम अधिकारी नीळकंठ विठ्ठलराव वाकुडकर – सेवा समाप्त
संबंधित तांत्रिक सहायक के. बी. देशपांडे – सेवा समाप्त
तांत्रिक सहायक व ग्रामरोजगार सेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
अपहाराची रक्कम वसूल करण्याचे निर्देश
तत्कालीन गटविकास अधिकारी (बीडीओ), सहायक लेखाधिकारी, ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित
सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांनी २८ फेब्रुवारी रोजी सेवा समाप्तीचे आदेश जारी केले.
सामुदायिक तक्रारींचीही चौकशी
सध्या कारवाई एका शेतकऱ्याच्या प्रकरणावर आधारित असली तरी धनगरवाडीतील अनेक शेतकऱ्यांनी सामूहिक तक्रारी दाखल केल्या आहेत. २८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील पथकाने गावात जाऊन चौकशी केली आहे.
या चौकशीचा सविस्तर अहवाल येत्या काही दिवसांत सादर होणार असून त्यानंतर प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे हे स्पष्ट होणार आहे.
प्रशासनात खळबळ
या कारवाईमुळे सेनगाव पंचायत समितीतील कथित भ्रष्ट साखळीचे धाबे दणाणले असून रोहयो योजनेतील कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासकीय निधीचा अपहार केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
अधिक वाचा : Tukadebandi Kayada : तुकडेबंदी हटली; आता १०-२० गुंठे जमीन विक्रीला परवानगी वाचा सविस्तर
Web Summary : A well scam in Hingoli's Dhanagarwadi exposed misappropriation of MGNREGA funds. Officials face inquiry after a complaint revealed payments for a non-existent well. Bogus labor was allegedly used to siphon funds. Action taken; further investigation is underway.
Web Summary : हिंगोली के धनगरवाड़ी में मनरेगा कुआँ घोटाला उजागर हुआ। शिकायत के बाद अधिकारियों पर जाँच, जिसमें पता चला कि गैर-मौजूद कुएं के लिए भुगतान किया गया। कथित तौर पर फर्जी मजदूरों का इस्तेमाल कर धन निकाला गया। कार्रवाई की गई, आगे की जाँच जारी है।