रऊफ शेख
फुलंब्री तालुक्यातील तब्बल ३३ गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पाणंद रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (MGNREGA Scheme)
या घोटाळ्यात एकाच ग्रुप फोटोचा वापर करून तब्बल ५ कोटी १८ लाख रुपयांचे बिले अकुशल मजुरीच्या नावाखाली काढण्यात आल्याचे उघड झाले. 'लोकमत'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच जिल्हा प्रशासनाने चौकशी समिती नेमली.(MGNREGA Scheme)
रोजगार सेवकांवर कारवाई; अभियंत्यांकडे दुर्लक्ष?
जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने २० दिवसांच्या तपासणीनंतर ७ रोजगार सेवक आणि ३ ऑपरेटर दोषी ठरवले. त्यानंतर उर्वरित ३३ गावांतील रोजगार सेवकांकडून लेखी खुलासे मागवले गेले. दोन्ही अहवाल जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
परंतु, संपूर्ण प्रकरणात तांत्रिक पातळीवर जबाबदारी असलेल्या अभियंत्यांकडे (तांत्रिक सहाय्यकांकडे) चौकशीदरम्यान संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे रोजगार सेवकांत संतापाची भावना आहे.
जबाबदारी कोणाची?
रोजगार सेवकांचे काम : मजुरांना कामावर हजर करणे, मस्टर तयार करणे व अभियंत्यांकडे सुपूर्द करणे.
अभियंते / तांत्रिक सहाय्यकांची जबाबदारी : कामाची पाहणी, मोजमाप तपासणे, हजेरी प्रमाणित करणे आणि निधी वितरणाला मंजुरी देणे.
यामुळे जर आमच्यावरच कारवाई होत असेल, तर अभियंते चौकशीबाहेर कसे?” असा प्रश्न रोजगार सेवकांनी उपस्थित केला आहे.
चौकशी समितीची भूमिका
उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा चौकशी समिती प्रमुख अनुपमा नंदनवकर यांनी सांगितले की, फुलंब्री तालुक्यातील पाणंद रस्त्यांच्या कामावर एकच फोटो वापरून बिले काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात रोजगार सेवकांची चौकशी पूर्ण झाली असून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
चौकशी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणाने जिल्हा प्रशासनातील चौकशी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. फक्त रोजगार सेवकांवर दोषारोप करत अभियंत्यांना अभय का दिले जातेय, हा मोठा प्रश्न उपस्थित होत असून प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.