Melghat Orange Palash : वसंत ऋतूच्या आगमनाने मेळघाट परिसरातील निसर्ग नव्या रुपात खुलला आहे. चिखलदरा आणि धारणीच्या डोंगरदऱ्यांत पळसाच्या झाडांनी सध्या केशरी झळाळी धारण केली असून संपूर्ण परिसर फुलांनी नटला आहे.(Melghat Orange Palash)
या नैसर्गिक सोहळ्याच्या साक्षीने आदिवासी बांधवांच्या सर्वात मोठ्या होळी उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पाच दिवस चालणाऱ्या 'फागुन महोत्सवा'मुळे मेळघाटात सांस्कृतिक जल्लोष रंगणार आहे.(Melghat Orange Palash)
पक्ष्यांसाठी मधुर मेजवानी
पळसाच्या फुलांमध्ये नैसर्गिक मकरंद मोठ्या प्रमाणात असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला अन्न-पाण्याची टंचाई भासत असताना हा मकरंद पक्ष्यांसाठी वरदान ठरतो.
लाल बुलबुल, पोपट, चिमण्या आणि घारींची झाडांवर मोठी गर्दी होत आहे. सकाळ-संध्याकाळ परिसरात पक्ष्यांच्या किलबिलाटाने वातावरण भारावून गेले आहे.
पळसाचे फूल हे मेळघाटातील जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक असून निसर्गचक्राशी त्याचे घट्ट नाते आहे.
पळसाचे औषधी व सांस्कृतिक महत्त्व
पळसाच्या फुलांचा (तेसू) वापर पारंपरिकरित्या होळीच्या नैसर्गिक रंगांसाठी केला जातो. हा रंग त्वचेसाठी सुरक्षित मानला जातो.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, त्वचारोगांवर तसेच केसांच्या वाढीसाठी पळस उपयुक्त ठरतो, असे आयुर्वेदात सांगितले जाते.
मानदुखी आणि स्नायूंच्या वेदनांवरही पळसाचा औषधी उपयोग केला जातो. त्यामुळे पळस हे केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून आरोग्यदायी वनस्पती म्हणूनही ओळखले जाते.
'फागुन महोत्सवा'ची परंपरा
आदिवासी संस्कृतीत होळी हा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. मेळघाटात हा उत्सव 'फागुन महोत्सवा'च्या रूपाने पाच दिवस साजरा होतो. पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी बांधव सामूहिक नृत्य करतात.
विशेषतः चिखलदरा आणि धारणीच्या दुर्गम भागांत आजही 'फगवा मागणे' ही परंपरा जपली जाते. रंग, नृत्य आणि लोकगीतांच्या माध्यमातून समुदायातील ऐक्य आणि आनंद व्यक्त केला जातो.
निसर्ग आणि संस्कृतीचे अनोखे नाते
मेळघाटातील पळसाचा बहर हा केवळ ऋतू बदलाचा संकेत नसून आदिवासी जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहे.
फागुन महोत्सवात पळसाच्या फुलांना विशेष स्थान आहे. नैसर्गिक रंग, औषधी गुणधर्म आणि जैवविविधतेसाठी असलेले योगदान यामुळे पळसाला 'वनाचा ज्वालामुखी' असेही संबोधले जाते.
वसंताच्या या सोहळ्यात मेळघाटातील डोंगररांगा केशरी रंगाने उजळल्या असून, निसर्ग आणि संस्कृतीचा संगम अनुभवण्यासाठी पर्यटकही आकर्षित होत आहेत. आगामी काही दिवसांत फागुन महोत्सवाच्या जल्लोषाने संपूर्ण परिसर रंगून जाणार आहे.
मेळघाटातील निसर्गचक्राचा आणि आदिवासी संस्कृतीचा पळस अविभाज्य भाग आहे. फागुन महोत्सवात या फुलांचे महत्त्व असते. विशेष म्हणजे, या फुलांचे औषधी गुणधर्म आणि नैसर्गिक रंग मानवी आरोग्याला तितकेच फायदेशीर आहेत.- अभिषेक खेरडे, निसर्ग अभ्यासक
Web Summary : Melghat's forests are ablaze with the vibrant orange of Palash flowers, signaling spring. This natural spectacle coincides with the tribal Holi festival, 'Phagun Mahotsav.' The flowers provide nectar for birds and hold medicinal and cultural significance for the local communities, painting a beautiful picture of nature and tradition.
Web Summary : मेलघाट के जंगल पलाश के जीवंत नारंगी रंग से जगमगा रहे हैं, जो वसंत का संकेत है। यह प्राकृतिक दृश्य आदिवासी होली त्योहार, 'फागुन महोत्सव' के साथ मेल खाता है। फूल पक्षियों के लिए अमृत प्रदान करते हैं और स्थानीय समुदायों के लिए औषधीय और सांस्कृतिक महत्व रखते हैं, जो प्रकृति और परंपरा का एक सुंदर चित्र पेश करते हैं।