बापू सोळंके बदलता निसर्ग, उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणारा दराचा ताळमेळ बसवत मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पीक पॅटर्न बदलून टाकला आहे. कधी काळी सर्वत्र दिसणारी हायब्रीड ज्वारी मराठवाड्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.(Marathwada Crop Pattern)
अनेक जिल्ह्यात कपाशीची जागा सोयाबीन आणि मका पिकाने घेतली आहे. मराठवाड्यात खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होते.(Marathwada Crop Pattern)
२५ ते ३० वर्षांपूर्वी मराठवाड्यात सर्वाधिक अर्थात ४० ते ५० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होत असे. यानंतर ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, तूर, कापूस, सूर्यफूल, तीळ, कारळ, मठ, हुलगे पिकांचा क्रम लागायचा.(Marathwada Crop Pattern)
आता लातूर, धाराशीव, नांदेड, बीड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापसाची साथ सोडून सोयाबीनला पसंती दिली. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात कापसाचा पेरा घटून सोयाबीन, मका पिकाकडे कल दिसतो.(Marathwada Crop Pattern)
काय सांगते आकडेवारी ?
पिकांची लागवड आकडेवारी (हेक्टरमध्ये)
पीकाचे नाव | सर्वसाधारण क्षेत्र | प्रत्यक्ष पेरा |
---|---|---|
खरीप ज्वारी | ७८,८८७ | १३,११४ |
सोयाबीन | २२,९८,१५५ | २३,२८,२७५ |
कापूस | १४,७९,५३५ | ११,८७,९८७ |
बाजरी | ८५,६५३ | ३,२५,३५२ |
मका | २,५६,५५० | ३,२५,८८९ |
मूग | १,२२,१५३ | ७६,५३९ |
उडीद | १,४४,४३१ | १,१७,०९२ |
भूईमूग | १४,२८६ | ८,९०२ |
कराळ | ३,८९८ | ८२६ |
पूर्वी खाण्यासाठी.. आता पैशासाठी उत्पादन
२५ ते ३० वर्षांपूर्वी शेतकरी खाण्यासाठी पिकवत असे. आता पैशासाठी उत्पादन घेण्यात येते. तेव्हा ग्रामीण अर्थव्यवस्था होती. हायब्रीड ज्वारी कोणीही खाण्यासाठी वापरत नाही. शिवाय या ज्वारीला दर मिळत नाही, यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ फिरवली. कापूस ९ महिन्यांचे हे पीक आहे.
गेल्या काही वर्षांपासून कापसाचा उत्पादन खर्च ज्या प्रमाणात वाढत आहे, दुसरीकडे कापसाचे दर कमी होत आहेत. सोयाबीन चार महिन्यांचे पीक व कमी उत्पादन खर्चात चांगले पैसे देणारे असल्याने मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. - डॉ. दिनकर जाधव, निवृत्त कृषी संचालक
शेतकऱ्यांची कापसाकडे पाठ का?
शासनामुळेच मराठवाड्यातील कापसाचे क्षेत्र कमी झाले आहे. बोलगार्ड बियाण्यांची रोगप्रतिकार शक्ती संपली आहे. परिणामी गुलाबी बोंडअळीचा या पिकांवर हल्ला होता. अळी कमी करण्यासाठी शेतकरी महागडी औषध फवारणी करतात. शिवाय कापूस वेचणीचा खर्चही अधिक असतो, यातून उत्पादन खर्च वाढतो. दुसरीकडे कापसाला चांगला भाव मिळत नाही, यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कापसाऐवजी सोयाबीनला पसंती वाढली आहे. - डॉ. भगवानराव कापसे, कृषी अभ्यासक