Tilgul Barfi Recipe : तिळगूळ बर्फी ही चविष्ट तर आहेच, पण ती पौष्टिकतेचा खजिनाही आहे. विशेषतः हिवाळ्यात शरीराला उष्णता आणि ऊर्जा देणारा हा पदार्थ आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. संक्रांतीसह संपूर्ण हिवाळ्यात तिळगूळ बर्फी आरोग्य आणि चवीचा उत्तम संगम ठरतो.
तिळगूळ बर्फी ही खूप चविष्ट आणि पौष्टिक मिठाई आहे, जी तीळ व गुळापासून बनवली जाते. हिवाळ्यात शरीराला उबदारपणा देते. तिळगूळ बर्फी चवीला उत्कृष्ट लागते आणि ती बनविण्याची प्रक्रियाही सोपी असते, ज्यात भाजलेले तीळ आणि शेंगदाणे गुळाच्या पाकात मिसळून बर्फीच्या स्वरूपात सेट केली जाते.
पदार्थ बनविण्यासाठी लागणारे साहित्य
पांढरे तीळ, गूळ (किसलेला), तूप, वेलदोड्याची पूड, बदाम/काजू (बारीक चिरलेले), दूध आदी साहित्य लागतात.
पदार्थ बनविण्याची कृती
- कढईत तीळ मंद आचेवर हलके गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
- ते थंड झाल्यावर मिक्सरमधून थोडे जाडसर दळून घ्या.
- त्याच कढईत तूप घालून किसलेला गूळ मंद आचेवर वितळवून घ्या.
- गूळ पूर्णपणे वितळल्यावर त्यात वेलदोड्याची पूड घाला.
- आता त्यात दळलेले तीळ घालून मिश्रण एकत्र करा. मिश्रण खूप कोरडे वाटल्यास दूध घाला.
- मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळा. तूप लावलेल्या थाळीत हे मिश्रण पसरवून वरून बदाम-काजू भुरभुरा.
- थंड झाल्यावर हव्या त्या आकाराचे बर्फीचे तुकडे कापावे.
आरोग्यदायी फायदे
- तीळ व गूळ दोन्हीही उष्ण गुणधर्माचे असल्याने हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यास मदत करतात.
- गुळामध्ये लोह (आयरन) मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि अॅनिमियाचा धोका कमी होतो.
- तिळांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस असल्याने हाडे व दात मजबूत राहतात.
- गूळ पचनसंस्थेस चालना देतो, बद्धकोष्ठता दूर करतो आणि आतड्यांची स्वच्छता राखतो.
