Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mahavistar AI App :'एआय'ची कमाल! ३८ लाख शेतकरी झाले स्मार्ट; एका क्लिकवर शेतीचा संपूर्ण प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 11:01 IST

Mahavistar AI App : शेतीत आता एआयची एंट्री झाली असून, महाविस्तार ॲपमुळे लाखो शेतकरी स्मार्ट बनत आहेत. ३८ लाखांहून अधिक शेतकरी या ॲपचा वापर करत असून, पेरणीपासून ते विक्रीपर्यंतची सर्व माहिती आता मोबाईलवर मिळत आहे.(Mahavistar AI App)

चंद्रमुनी बलखंडे

राज्यातील शेती अधिक आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार ॲप सध्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.(Mahavistar AI App)

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित या ॲपचा वापर राज्यातील तब्बल ३८ लाख ४२ हजार १४ शेतकऱ्यांनी सुरू केला असून, पेरणीपासून ते विक्रीपर्यंतची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.(Mahavistar AI App)

हे अत्याधुनिक मोबाइल ॲप शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या स्थानानुसार, पिकांच्या प्रकारानुसार आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार वैयक्तिकृत मार्गदर्शन देते.(Mahavistar AI App)

हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, खतांचे योग्य प्रमाण, बाजारभाव आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती या ॲपमधून सहज मिळत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, शेतकरी अधिक 'स्मार्ट' बनत आहेत. (Mahavistar AI App)

पेरणीपासून विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन

महाविस्तार ॲपमुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व तयारी, बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन, सिंचन, तसेच काढणी आणि बाजारपेठेतील विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सल्ला मिळतो.

जमिनीच्या प्रकारानुसार नत्र, स्फुरद, पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अचूक प्रमाण किती द्यावे, याची माहिती ॲपमध्ये उपलब्ध आहे.

किड-रोग ओळखण्यासाठी फोटो फीचर

या ॲपचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे फोटो अपलोड सुविधा. शेतकरी पिकाचा किंवा पानांचा फोटो काढून अपलोड करताच किडीचा प्रादुर्भाव ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना सुचवल्या जातात. तसेच चॅटबॉटच्या मदतीने कोणताही शेतीविषयक प्रश्न विचारल्यास त्वरित आणि अचूक उत्तर मिळते.

अहिल्यानगर जिल्हा आघाडीवर

महाविस्तार ॲपचा प्रसार करण्यासाठी कृषी विभागाने गावागावात मोहिम राबवली आहे. त्याचा परिणाम म्हणून अहिल्यानगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून, येथे ३ लाख १६ हजार ३६४ शेतकरी ॲप वापरत आहेत. पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा हे जिल्हेही आघाडीवर आहेत.

कराड तालुका टॉपवर

तालुकास्तरावर कराडने बाजी मारली असून, येथे सर्वाधिक ४० हजार ७०० शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड केले आहे. कृषी सहाय्यकांना दिलेल्या उद्दिष्टांमुळे ॲपचा प्रसार वेगाने होत आहे.

मराठवाड्यात ९ लाखांहून अधिक शेतकरी जोडले

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये एकूण ९ लाख ३ हजार ७८६ शेतकरी महाविस्तार ॲपशी जोडले गेले आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

शेतीत डिजिटल क्रांतीकडे वाटचाल

महाविस्तार ॲपमुळे शेतीत माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, शेतकरी निर्णय अधिक अचूक आणि वेळेवर घेऊ लागले आहेत.

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हे ॲप शेतकऱ्यांसाठी 'डिजिटल सल्लागार' ठरत आहे. भविष्यात या ॲपचा वापर आणखी वाढण्याची शक्यता असून, शेती अधिक स्मार्ट आणि नफ्याची होण्याचा मार्ग मोकळा होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean AI Farming : धाराशिवमध्ये स्मार्ट शेतीचा प्रयोग; AI मुळे सोयाबीनचे उत्पन्न वाढले

अधिक वाचा : Mahavistar AI App : शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाकडे मोठी झेप; ‘महाविस्तार’ ॲपला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

English
हिंदी सारांश
Web Title : Mahavistar AI App: 3.8 Million Farmers Get Smart Farming Solutions

Web Summary : The Mahavistar AI app is transforming farming in Maharashtra, benefiting 3.8 million farmers. It offers personalized guidance on crop management, weather forecasts, and market prices, empowering farmers with digital tools for increased efficiency and profitability.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकृषी योजना