भंडारा : भंडारा जिल्ह्यात दोन्ही हंगामात धानपीक (Paddy farming) हे मुख् पीक आहे. धानपीक घ्यायला पाणी खूप मोठ्या प्रमाणात लागते. त्या प्रमाणात पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे.
भूजलाचा विचार करून पालांदूर येथील अरुण पडोळे यांनी पाच एकरपैकी दोन एकर जागेवर मिरचीची लागवड (Mirchi Lagvad) करीत भरघोस उत्पन्न घेतले. मात्र गत दीड महिन्यापासून हिरव्या मिरचीचे दर पडले. त्यांनी हिरवी मिरची तोडणेऐवजी लाल मिरची केली. तिला परिपक्व करीत पूर्णतः सुकवून नागपूरच्या बाजारपेठेत विक्रीला रवाना केली.
अरुण पडोळे हे मूळचे नागपूर (Nagpur District) जिल्ह्याचे रहिवासी आहेत. मात्र त्यांची शेती गोसेखुर्द प्रकल्पात बाधित झाल्याने त्यांनी पालांदूर येथे पाच एकर शेती खरेदी केली. आधी पाचही एकरात सिंचनाची स्वतंत्र सुविधा केली. काही वर्षे त्यांनी धानाचे उत्पादन घेतले. पालांदूर व परिसरात उत्कृष्ट मिरची उत्पादक म्हणून पडोळे यांची ख्याती आहे.
आजही पारंपरिक बैलजोडी व खुरपणीचा आधार घेऊन कमी खर्चात पारंपरिक पण नवी शक्कल लढवून मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले. लाल मिरची घरी खाण्याकरिता स्थानिक ठिकाणी मोठी मागणी आहे. घरूनच पहिल्या तोड्याची मिरची १८० रुपये किलोपर्यंतच्या दराने विकली. शिवाय मिरची पिकात काम करताना मजुरांची मोठी गरज असते. पडोळे यांनी किमान ५० महिला मजुरांना तर पाच पुरुष मजुरांना काम पुरविले आहे.
२ एकरात लाल व हिरव्या मिरचीचे उत्पन्न...
ऑगस्ट महिन्यात रोप टाकले. नोव्हेंबर महिन्यात मिरचीचा तोडा सुरू झाला. फेब्रुवारी महिन्यापर्यंत हिरव्या मिरचीला बऱ्यापैकी दर होते. मात्र त्यानंतर हिख्या मिरचीचे दर कमी होत आले. त्यामुळे त्यांनी जुना अनुभव पाठीशी घेऊन हिरवी मिरची तोडण्याचे बंद केले. लाल मिरचीचे उत्पादन सुरू झाले.
शीतगृहात ठेवून अधिक दराची प्रतीक्षा
पालांदूर परिसरातील नियमित ग्राहकांची अपेक्षा/मागणी पूर्ण करून उरलेली लाल मिरची नागपूरच्या बाजारपेठेकरिता रवाना करण्यात आली. परंतु वर्तमानातील लाल मिरचीचे भाव परवडणारे नाही. ही मिरची अपेक्षित दरात विकली नाही तर शीतगृहात ठेवून अधिक दराची प्रतीक्षा करणार आहेत.