Join us

Khurasani Crop : खुरासणी पिकाचे क्षेत्र होतंय कमी, जनजागृतीसाठी गावामध्ये जनसंवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:24 IST

Khurasani Crop : मुरशेत गावात 'शेतकरी प्रशिक्षण व खुरासणी पिकाच्या आद्यरेखा पिक प्रात्यक्षिक धारक शेतकऱ्यांना निविष्ठा वाटप कार्यक्रम" संपन्न झाला.

Khurasani Crop :  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (Krushi Vidyapith rahuri) अंतर्गत अखिल भारतीय समन्वित खुरासणी संशोधन प्रकल्प, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी व प्रकल्प संचालनालय अखिल भारतीय समन्वित खुरासणी व तीळ संशोधन प्रकल्प, जबलपूर यांचे संयुक्त विद्यमाने आदिवासी उप-योजना (TSP) अंतर्गत अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी क्षेत्रातील मुरशेत गावात 'शेतकरी प्रशिक्षण व खुरासणी पिकाच्या आद्यरेखा पिक प्रात्यक्षिक धारक शेतकऱ्यांना निविष्ठा वाटप कार्यक्रम" संपन्न झाला.

खुरासणी (Khurasani crop) हे आरोग्यदायी, पचनास हलके, पौष्टिक तेलाचा उत्तम स्रोत असणारे उपपर्वतीय विभागातील महत्वाचे पिक आहे. या पिकाच्या बियांपासून मिळणाऱ्या तेलाला "डोंगराळ भागातील लोकांचे तूप' असेही म्हटले जाते. परंतु दिवसेंदिवस या पिकाखालील पारंपारिक क्षेत्र कमी होत आहे.

म्हणून या पिकाखालील पेरा वाढावा आणि शेतकऱ्यांना तेलाचे महत्व कळावे म्हणून अखिल भारतीय समन्वित खुरासणी संशोधन प्रकल्प, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांचे मार्फत खरीप २०२४ हंगामात आदिवासी उप योजेनेंतर्गत आद्यारेखा पिक प्रात्याक्षिके मुरशेत ता. अकोले या गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आली होती. 

या शेतकरी प्रशिक्षण व निविष्ठा वाटप कार्यक्रमामध्ये संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक मा. डॉ. हेमंत पाटील म्हणाले कि, शेतकऱ्यांना विभागीय संशोधन केंद्राचे कार्य आणि भाताच्या इंद्रायणी वाण तसेच युरिया- डीएपी गोळी खत या विद्यापीठाच्या उत्पादनांचा शेतकऱ्यांनी वापर करण्याचे आवाहन केले.  शेतकऱ्यांशी संवाद साधून खुरासणी, भात, नागली, वरई लागवड तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, जमिनीचे आरोग्य, मृदा व जलसंधारण इत्यादी विषयवार मार्गदर्शन केले. 

उपस्थित लाभार्थ्यांना किट वाटप कार्यक्रमाचे प्रास्ताविक खुरासणी पैदासकार, डॉ दिपक डामसे यांनी केले. यावेळी डॉ. दिपक डामसे यांनी खुरासणी पिकाचे महत्व आणि लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करून खुरासणी पिकाचा पेरा वाढविण्याचे तसेच तेलाचे मूल्य जाणून त्याचा आहारात नियमित समावेश करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.

यावेळी उपस्थित लाभार्थी शेतकऱ्यांना अ.भा. समन्वित खुरासणी प्रकल्पाच्या वतीने बॅटरीचलित फवारणी पंप, ५० किलो १४:३५:१४ खताची गोणी, ताडपत्री, स्फुरद विरघळविणारे जीवाणू, ट्रायकोडॉर्मा, खुरासणी पिक माहिती पुस्तिका, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषीदर्शिनी, खुरासणी पिकावरील तणनाशक इत्यादी निविष्ठा मोफत पुरविण्यात आल्या.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीनाशिक