Join us

Kharif Crop Damage : शेती उद्ध्वस्त, कर्जाचा बोजा अन् सणांवर काळे ढग वाचा शेतकऱ्यांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:19 IST

Kharif Crop Damage : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. सततच्या पावसामुळे ५८ हजार हेक्टरवरील पिके पूर्णतः जमिनदोस्त झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दसरा-दिवाळीचे सण दारात असतानाही पिकलेच नाही तर काय खायचं? असा हतबल प्रश्न बळीराजा विचारतो आहे. (Kharif Crop Damage)

मारोती चिलपिपरे 

सतत सुरू असलेल्या पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पिकांमधून भांडवली खर्चही निघणार नाही, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यांत अश्रू तर माथ्यावर चिंतेचा डोंगर असा चित्र दिसत असून, शेतकऱ्यांचे डोळे पाणावले जात आहेत. (Kharif Crop Damage)

शेतकरी दरवर्षी चांगल्या उत्पादन व उत्पन्नाची अपेक्षा करतो. मात्र सलग तिसऱ्या वर्षी अतिवृष्टीमुळे त्यांची निराशाच पदरी पडली आहे. यंदा दसरा आणि दिवाळीचे सण तोंडावर आलेले असतानाही उत्पन्नच नाही, तर सण कसा साजरा करायचा? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.(Kharif Crop Damage)

अतिवृष्टीने हाहाकार

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे कंधार तालुक्यातील सातही महसूल मंडळात हाहाकार माजला. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस यांसारख्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून पिके सडून गेली, तर काही ठिकाणी पिके वाहून गेली.

यामुळे हजारो हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त झाली आहे. ऐन पेरणी व मशागतीसाठी केलेला खर्च वाया गेल्याने शेतकऱ्यांसमोर प्रचंड आर्थिक संकट उभे राहिले आहे.

बँकेचे कर्ज फेडायचे कसे?

शेतीतील नुकसानीमुळे अनेक शेतकऱ्यांपुढे बँकांचे कर्ज फेडायचे कसे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पीककर्जाचे हप्ते थकले असून, पुढील हंगामासाठी कर्ज मिळणे कठीण होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

याशिवाय गुराढोरांच्या देखभालीवरही मोठा परिणाम झाला असून, ग्रामीण अर्थचक्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

५८ हजार हेक्टरवरील पिके बाधित

तालुक्यात एकूण ५८ हजार ७७७ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली. या नुकसानीसाठी ५४ कोटी ६१ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

शासनाकडून निधी प्राप्त झाला असून याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे. पुढील आठ दिवसांत हे पूर्ण होईल. त्यानंतर ई-केवायसीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. - रामेश्वर गोरे, तहसीलदार

सणासुदीवर सावट

दसरा आणि दिवाळी तोंडावर आले आहेत. मात्र, शेतकरी पिकलेच नाही, तर काय खायचं? अशी हतबल प्रतिक्रिया देत आहेत. 

रब्बी पिकांच्या पेरणीसाठी पैसा लागणार, जुन्या उधाऱ्या परत द्याव्या लागणार आहेत. शासनाकडून मिळणारी मदत तोकडी असून, त्यातून मुलभूत गरजाही भागणार नाहीत, अशी नाराजी शेतकऱ्यांत आहे.

ग्रामीण भागातील दुकानदार व नागरिकांमध्येही चर्चा आहे की, या संकटामुळे पुढील काही दिवसांत ग्रामीण अर्थचक्र थांबणार तर नाही ना?

हे ही वाचा सविस्तर : Marigold Flower Damage : अति झाली अतिवृष्टी; सणांच्या तोंडावर झेंडूच्या फुलांचे नुकसान वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Crop Destruction, Debt Burden, and Dark Clouds over Festivals

Web Summary : Kandhar farmers face ruin due to excessive rain, destroying crops across 58,000 hectares. Debt looms, and upcoming festivals are overshadowed by financial despair. Farmers question how they will celebrate without income, struggling with basic needs.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीनांदेडपाऊस