नाशिक : आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या करडईच्या तेलाने उच्चांकी दर गाठला आहे. प्रतिकिलो ४०० ते ४२० रुपये भाव पोहोचला आहे. असे असताना रब्बी हंगामातीलकरडईची पेरणी जिल्ह्यात तीन वर्षांपासून शून्य टक्क्यांवर आहे.
खरीप हंगामात मात्र सोयाबीनची पेरणी एक लाख हेक्टरवर झाली होती. सोयाबीन तेलाचादेखील स्वयंपाकात अधिक वापर होतो. जिल्ह्यातील ६० टक्के शेतकरी व्यापाऱ्यांमार्फत तेल कंपन्यांना सोयाबीन पुरवतात. धुळे, सोलापूर, परभणी, बीड, अहिल्यानगर येथे करडईची लागवड होते. तेथूनच नाशिक जिल्ह्यात करडईचे तेल आयात होते.
करडई तेलाची मागणी वाढली
शेतकऱ्यांनी करडई लागवडीकडे पाठ फिरवली आहे. ज्यामुळे त्याचे उत्पादन कमी झाले आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारात तेलाचा पुरवठा कमी झाला आहे आणि मागणी-पुरवठ्याच्या व्यस्ततेमुळे तेलाची किंमत वाढली आहे. सहा महिन्यांत करडई तेलाचे भाव किलोमागे १०० रुपयांनी जास्त झाले. पिकाचे उत्पादन कमी झाले. त्यात बाजारात करडई तेलाची मागणी वाढली. पुरवठा मर्यादित राहिल्यानेच किमती वाढल्या.
तरीही करडईचा पेरा कमी कशामुळे?
जागतिक व्यापारातून स्वस्त पामतेलाची आयात वाढल्याने करडईला भाव मिळत नाही. शिवाय, करडईच्या काढणी आणि मळणीमध्ये काटेरी स्वरूपामुळे मजुरांची अडचण येते. ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे पीक कमी परवडणारे ठरते.
आरोग्यासाठी करडईचे तेल लाभदायक
आरोग्यासाठी करडईचे तेल लाभदायक आहे. त्यात 'चांगल्या' फॅट्स जास्त असतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. हे तेल मधुमेहाच्या रुग्णांसाठीही उपयुक्त आहे. कारण ते इन्सुलीन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते. तसेच त्यात व्हिटॅमिन-ई भरपूर असल्याने त्वचेसाठीही फायदेशीर आहे.
