Join us

Kardai Lagvad : करडई लागवड फायद्याची, परभणी जिल्ह्यात एका शेतकऱ्याकडून 40 एकरवर लागवड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 19:26 IST

Kardai Lagvad : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात (Marathwada Krushi Vidyapith) करडईचे सरस वाण विकसित करण्यात आले आहेत.

Kardai Lagvad :  वसंतराव नाईक मराठवाडाकृषि विद्यापीठात (Marathwada Krushi Vidyapith) करडईचे सरस वाण विकसित करण्यात आले आहेत. या वाणांमुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये करडईची उत्पादकता वाढली आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत येथील शेतकरी वसंतराव लाड यांच्‍या ४० एकर क्षेत्रावर विद्यापीठ विकसित करडई वाणाची लागवड (Kardai Seed) करण्यात आली आहे. 

मानवत येथील करडई उत्‍पादक (Kardai Farming) शेतकरी वसंतराव लाड यांच्‍या ४० एकर क्षेत्रावर विद्यापीठ विकसित पीबीएनएस १२ आणि पीबीएनएस ८६ (परभणी पूर्णा) या दोन वाणाची लागवड केली आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या करडई संशोधन केंद्र मार्फत प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह  संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे आदी उपस्थित होते. 

वसंतराव लाड हे दरवर्षी अंदाजे ४० ते ५० एकर करडई पिकाची पेरणी करतात. यावर्षी करडई संशोधन केंद्रद्वारे प्रसारित वाण पीबीएनएस १२ आणि पीबीएनएस ८६ (परभणी पूर्णा) या दोन वाणाची त्यांनी पेरणी केली आहे. हे दोन्ही वाण मराठवाडा विभागात शेतकरी बांधवामध्‍ये प्रचलित आहेत. ते दरवर्षी कबाईन हार्वेस्‍टरव्‍दारे काढणी करतात. या वाणांमधील तेलाचे प्रमाण ३० टक्के असून उत्पादन बागायतीमध्ये १८ ते २० क्विंटल तर कोरडवाहूमध्ये १२ ते १४ क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. 

करडईबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती 

करडई पिकासाठी लागवडीचा खर्च कमी असून कोरडवाहू किंवा एक ते दोन पाण्याची उपलब्धता असल्यास बागायती पीक घेतले जाते. यावेळी कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, करडई पिकास फवारणी, काढणी व मळणी यंत्राच्या साहाय्याने होत असल्याने या पिकाविषयीची धारणा बदलेली आहे. देशाला खाद्यतेल मोठया प्रमाणात आयात करावे लागते. करडईचे तेल सर्वोच्च दर्जाचे असून त्यास चांगला बाजारभाव देखील मिळत आहे. विशेष करून या पिकास पशुधनापासून तसेच जंगली प्राण्यापासून धोका उद्भवत नाही. 

करडई पीकाची पाहणी

तसेच यांत्रिकीकरणामुळे करडई या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शेतकऱ्यांना या पिकाचे गुणवत्ता युक्त बियाणे आणि आवश्यक तंत्रज्ञान देण्यासाठी विद्यापीठ तत्पर आहे. यामुळे करडईसारख्या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे नमूद केले. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री वसंतराव लाड यांच्या शेतावर घेण्यात आलेल्या ४० एकर करडईचे पीकाची पाहणी माननीय कुलगुरू यांनी केली. संशोधन संचालक डॉ खिजर बेग म्‍हणाले की, लवकरच अधिक तेलाचे प्रमाण असणारे करडई वाण प्रसारित करण्‍यात येणार आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजनामराठवाडा