Join us

Kanda Bharpai : नुकसानग्रस्त कांद्याला प्रति एकरी 40 हजाराची भरपाई, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 13:49 IST

Kanda Bharpai : तणनाशक जाळण्यासाठी केलेल्या औषध फवारणीमुळे (Aushadh Fawarani) कांदा पीकच जळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

नाशिक : सदोष तणनाशकाच्या फवारणीमुळे (Herbicide spraying) नाशिक  जिल्ह्यात कांदा पिकांचे नुकसान (Kanda Pik Nuksan) झाल्याचा प्रकार जानेवारी महिन्यात उघडकीस आला होता. त्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आदेशान्वये संबंधित तणनाशकाची विक्री रोखण्यात येऊन कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार दोन कंपन्यांनी ४८ शेतकऱ्यांना २७ लाख २० हजाराची नुकसानभरपाई देण्यात आली. अजून काही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असल्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच तणनाशक जाळण्यासाठी केलेल्या औषध फवारणीमुळे (Aushadh Fawarani) कांदा पीकच जळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जिल्ह्यात रब्बीच्या हंगामात मोठ्या प्रमाणातर कांद्याचे पीक घेण्यात आले आहे. कांदा पिकात गवत वाढल्याने ते नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी तणनाशकाची फवारणी केली. 

परंतु, यानंतर काही दिवसांतच कांदा पीक जळून गेले. देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर, येवला, सटाणा तालुक्यांमध्ये नुकसान झाल्याचे त्या त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सांगितले होते. आयपीएल व अनु प्रोडक्ट या दोन कंपन्यांचे तणनाशक फवारणीमुळे कांदा पिकाचे नुकसान झाले होते. कृषिमंत्री कोकाटे यांच्या प्रयत्नातून व महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा पाठपुरावा यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय दोन्ही कंपन्यांनी घेतला.

येथे मिळाली भरपाईमुखेड (ता. येवला) येथील २६ शेतकऱ्यांचे ३६ एकर क्षेत्र सदोष तणनाशकामुळे बाधित झाले होते. तर, निफाड तालुक्यातील शिंपी टाकळी, लालवाडी, चितेगाव येथील २२ शेतकऱ्यांचे ३२ एकर क्षेत्र बाधित झाले होते. प्रत्येकी एक एकरला ४० हजाराची भरपाई देण्यात आली.

दोन्ही कंपन्यांकडून नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकर ४० हजारांची भरपाई मिळाली, हा तात्पुरता दिलासा झाला. तणनाशकाने कांद्याचे नुकसान झाले नसते तर कांदा उत्पादनातून शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक उत्पन्न मिळाले असते. आता कृषी विभागाने यापुढील काळात कोणत्याही कंपनीकडून व विक्रेत्यांकडून खते, औषधे व बियाण्यात शेतकऱ्यांची फसवणूकच होणार नाही यासाठी अधिकची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीपीक विमानाशिक