Join us

आमदार, खासदार, मंत्र्यांचे फोन खणखणले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उडवली धांदल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 20:43 IST

Phone Call Protest : महाराष्ट्र भरातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे फोन आमदार, खासदार, मंत्र्यांना जात आहेत. 

नाशिक : कांद्याचे कोसळलेले भाव वाढावेत, यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने पुकारलेल्या 'फोन करो' आंदोलनाला शेतकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र भरातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे फोन आमदार, खासदार, मंत्र्यांना जात आहेत. 

राज्यातील खासदार, आमदार, विविध मंत्र्यांना शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी फोन करून कांदाप्रश्नी जाब विचारला. सत्ताधारी कांद्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन दिले तर विरोधी गटातील लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारवर टीका केली.

या फोन कॉल्समुळे अनेक लोकप्रतिनिधींची धांदल उडाली असून, अनेकांनी स्वीय सहायकांशी शेतकऱ्यांना चर्चा करण्यास सांगितले. शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे यांनी आवाहन केल्यानुसार, हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.

कृषिमंत्री भरणे यांचे आश्वासनकृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी एक, दोन शेतकऱ्यांचा संपर्क झाल्याचे संघटनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यात भरणे यांनी कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळण्यासाठी राज्याचे शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन दिले.

यांच्याशी संपर्कपणन मंत्री जयकुमार रावल, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मंत्री जयकुमार रावल, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, खासदार नीलेश लंके (अहिल्यानगर), खासदार भास्कर भगरे (दिंडोरी), संदीपानराव भुमरे (छत्रपती संभाजीनगर), राजाभाऊ वाजे (नाशिक), गोवाल पाडवी (नंदुरबार), ओमराजे निंबाळकर आदींशी शेतकऱ्यांचा संपर्क झाला.

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती