- भाऊराव वाळके नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक कांदा आणि टोमॅटो आहे. या पिकांवरच तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र अवलंबून असते. मात्र, यंदा कांदा साठवूनही शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
सहा महिने चाळीत कांदा ठेवूनही शेतकऱ्यांना सरासरी हजार ते बाराशे रुपयांना कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे पुढील खरिपातील लागवडीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीतून थोडाफार नफा झाला होता. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा साठवला; पण आता कांदा खराब होऊ लागल्याने आणि दर खाली आल्याने शेतकऱ्यांना तोट्याला कांदा विकावा लागत आहे. चाळीत कांदा सडल्याने दुहेरी फटका बसला आहे.
शासनाने कांदाचाळ उभारणीसाठी दिलेल्या अनुदानाचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला असला तरी साठवणुकीतून नफा न मिळाल्यास भविष्यात साठवणुकीत शेतकरी कमी रस दाखवतील, अशी भीती आहे.
दरम्यान, यावर्षी शेतकऱ्यांना सुरुवातीला टोमॅटोतून काहीसा फायदा झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटोवर मोठा खर्च केला. एक एकर टोमॅटो उभा करण्यासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च येतो. मात्र आजच्या भावात (२० किलो कॅरेटला सरासरी २०० रुपये) शेतकऱ्यांना आठ-दहा रुपये किलोप्रमाणे खर्चसुद्धा वसूल होत नाही. उन्हाच्या तीव्रतेमुळे टोमॅटो लवकर पिकत असल्याने मोठ्या प्रमाणात आवक वाढली आणि भाव कोसळले. यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
भाववाढीच्या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली; पण आता दिवसेंदिवस कांदा खराब होत असून आधीच दोन हजारावर गेलेला कांदा सरासरी हजार ते बाराशे रुपयांवर आल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.- मल्हारी दराडे, कांदा उत्पादक शेतकरी