नाशिक : मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा रब्बी हंगामात उन्हाळी कांदा लागवडीवर भर दिला असून, सद्यःस्थितीत लागवडीचा वेग आल्याचे दिसून येत आहे. उपलब्ध पाणीसाठा, अनुकूल हवामान आणि समाधानकारक बाजारभाव यांचा विचार करता कांद्याच्या उत्पादनातून चांगला आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळेच जानेवारी महिन्याअखेरीस कांदा लागवड क्षेत्रात सुमारे १० हजार हेक्टरची वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
उन्हाळी कांदा लागवड सुरू होत आतापर्यंत तालुक्यात ६ हजार १६६ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. याआधी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस मालेगाव, दाभाडी, सौंदाणे व झोडगे या चार महसूल मंडळांमध्ये २२११ हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. लागवडीचा वेग वाढल्याने ही संख्या वाढली आहे. रब्बीच्या सुरुवातीच्या टप्प्यात थंडीचे अपेक्षित प्रमाण नसल्याने सुरुवातीचे कांदारोप मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी कांदा रोपांची दुबार पेरणी करत आर्थिक समीकरण सावरले आहे.
शेतकऱ्यांना आशामालेगाव तालुक्यासह कळवण, सटाणा व देवळा तालुक्यांमध्येही कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कांदा व मका पिकांवर अवलंबून आहे. योग्य वातावरण, मुबलक पाणी आणि चांगला बाजारभाव या बाबी कांदा उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरत असून यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
लागवडीसाठी कांदा रोपांची मागणी वाढलीकांदा लागवड सुरू झाल्याने तालुक्यात रोपांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या एक एकर लागवडीसाठी लागणाऱ्या रोपांसाठी २० ते २२ हजार रुपये खर्च येत असून कांदा बियाण्याचा दर सुमारे २५०० रुपये किलो आहे. साधारण तीन किलो बियाण्यांपासून एका एकरासाठी पुरेसे रोप तयार होते. सध्या तालुक्यात २७३६ हेक्टरवर उन्हाळी कांदा रोपे तयार झाली असून, यामध्ये मालेगाव ५१३, दाभाडी ८५३ तर सौंदाणे व झोडगे मंडळांमध्ये ४१७ हेक्टरवर रोपांची लागवड झाली आहे.
आतापर्यंत २५,६३५ हेक्टरवर लागवड पूर्णयावर्षी तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने शेतीसाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. विहिरी व जलस्रोतांमध्ये पुढील काही महिने समाधानकारक पाणीसाठा राहणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पीक नियोजनात बदल करत मका पिकाऐवजी उन्हाळी कांद्याला प्राधान्य दिले आहे. अंतिम खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी कांदा अशी एकत्रित लागवड तब्बल २५,६३५ हेक्टरवर झाली आहे.
तालुक्यातील कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी कांदा रोपे तयार केली आहेत. सध्या लागवड सुरू आहे. जानेवारीअखेर लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होईल, मागील वर्षी फेब्रुवारीपर्यंत लागवड सुरू होती.- भगवान गोर्डे, तालुका कृषी अधिकारी, मालेगाव
Web Summary : Malegaon farmers prioritize summer onion planting due to favorable conditions. January-end planting expected to increase by 10,000 hectares. Onion seedlings demand rises, costing ₹20-22,000 per acre. Farmers opt for onion over maize with ample water availability; 25,635 hectares planted.
Web Summary : मालेगांव के किसानों ने अनुकूल परिस्थितियों के कारण ग्रीष्मकालीन प्याज की रोपाई को प्राथमिकता दी। जनवरी के अंत तक रोपण में 10,000 हेक्टेयर की वृद्धि होने की उम्मीद है। प्याज के पौधों की मांग बढ़ी, जिसकी लागत ₹20-22,000 प्रति एकड़ है। पर्याप्त पानी की उपलब्धता के साथ किसान मक्का की तुलना में प्याज को पसंद करते हैं; 25,635 हेक्टेयर में रोपण किया गया।