Join us

भाव नाही, कापसाची साठवणूक वाढली, पण आता कापूस उत्पादकांसमोर नवं संकट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 12:33 IST

कापसाची साठवण करायची की किडींच्या त्रासामुळे मिळेल, त्या भावात कापूस विकायचा का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जळगाव : सद्यस्थितीत कापसाला हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत आहे. काही शेतकऱ्यांनी दर वाढतील, या आशेने कापूस साठवून ठेवला. मात्र, या कापसातच आता कीटक तयार होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अंगावर खाज, पुरळ येत आहे. आधीच दर कमी, त्यात साठवला तर आरोग्याला धोका, अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

यंदा केंद्र शासनाने कापसाला ६६२० ते ७०२० रुपये प्रतिक्विंटल असा दर जाहीर केला आहे. कापसाच्या खासगी बाजारपेठेत मात्र ६५०० ते ६६५० रुपयांपर्यंत भाव सुरू आहे. शासकीय खरेदी सुरू नसल्याने शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवणूक करीत आहेत. या साठवलेल्या कापसात कीड तयार होत असून त्यामुळे घरातील सदस्यांना खाज पुरळ आली त्रास होत आहे. कापसाची साठवण करायची की किडींच्या त्रासामुळे मिळेल त्या भावात कापूस विकायचा का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कापूस घरीच असल्याने आता कापसाच्या संपर्कात आल्यास किंवा हात लावल्यास खाज सुटत आहे, याचा विपरित परिणाम शेतकऱ्यांच्या शरीरावर व्हायला लागला आहे. कापसामुळे हातापायांवर, पाठीवर, पोटावर मोठ्या प्रमाणात पुरळ येत आहे. त्वचा लाल पडत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी उपचार घेत आहे.

अशी दिसतात लक्षणे 

मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे म्हणाले की कापसात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने संपर्कात आलेल्या व्यक्तीला खाज सुटते तर अंगावर बारीक पुरळ येणे, त्वचा लाल होणे आदी प्रकार घडत आहे. हा अॅलर्जीचा प्रकार असून, बाधितांनी त्वरित उपचार घेणे गरजेचे आहे. तर तालुका कृषी अधिकारी म्हणाले कि कापसाची साठवणूक करतांना स्वतंत्र खोलीत किंवा गोदामात साठवणूक करावी, साठा असलेल्या ठिकाणी आर्द्रतेमुळे कीटक प्रादुर्भाव होत असतो. शेतकऱ्यांनी याबाबत काळजी घ्यावी

नाईलाजाने कापूस विक्री

शेतकऱ्यांनी त्वचेच्या आजाराच्या भीतीपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करायला सुरुवात केली आहे. कोणत्याही आजाराला बळी पडण्यापेक्षा कापूस विकलेला बरा, या मानसिकतेतून काही शेतकरी नाईलाजाने कापसाला कवडीमोल भावात विक्री करीत आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीशेतकरीकापूसमार्केट यार्ड