जळगाव : तालुक्यातील अनेक भागात रब्बी हंगामातील पिकांवर अस्मानी-सुलतानी संकटांचा मोठा फटका बसला आहे. अवघ्या आठ दिवसांत दोन वेळा, तर महिनाभरात तीन वेळा वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात भर म्हणून की काय आता मका खुडण्याच्या मजुरीतही भरमसाठ वाढ झाली आहे.
मका खुडण्यासाठी याआधी एकरी मजुरी पाच ते सहा हजार रुपये होती, ती आता एकरी आठ हजार रुपये झाली आहे. त्यामुळे अवकाळीत तेरावा महिना अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे मका, ज्वारी, बाजरी, गहू यांसारखी उभी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
दि. २ रोजी सायंकाळी सुमारे दीड तास जोरदार पाऊस झाला. यामध्ये तांदुळवाडी व मळगाव परिसरातील मका व ज्वारी पिके पूर्णपणे आडवी झाली. तसेच शेतातील पत्रे, शेड, पाणीपुरवठा साधने व कृषी उपकरणांचेही मोठे नुकसान झाले आहे.
यापूर्वीच पहिल्या पावसात मका पीक काही प्रमाणात आडवे झाले होते. ते खुडण्यासाठी शेतकऱ्यांना मजुरी देऊन मजूर लावावे लागत होते. कणसे बांधावर आणण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच आठ दिवस उलटताच दि. ३ रोजी पुन्हा झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे.
अवकाळी पाऊस व वादळामुळे ज्वारी, बाजरी, मका, गहू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे करून सर्वांना न्याय द्यावा, अन्यथा प्रशासनाबद्दल नाराजी वाढत आहे.- गुलाब पाटील, माजी सरपंच, मळगाव
अवकाळीमुळे भडगाव तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर मजुरी दर मोठ्या प्रमाणात वाढले असून हा मजुरीचा खर्च परवडत नाही. त्यातच पावसात मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा आहे.- शैलेश मोरे, शेतकरी, मळगाव
Web Summary : Jalgaon farmers face increased corn harvesting costs after unseasonal rains devastated crops. Wages rose from 5-6 thousand to 8 thousand rupees per acre, compounding losses from damaged corn, sorghum, and wheat. Farmers demand government assessment and compensation for the extensive damage.
Web Summary : जळगाव के किसान बेमौसम बारिश से फसलों के नुकसान के बाद मक्का कटाई की बढ़ती लागत से जूझ रहे हैं। मजदूरी 5-6 हजार से बढ़कर 8 हजार रुपये प्रति एकड़ हो गई है, जिससे मक्का, ज्वार और गेहूं को हुए नुकसान और बढ़ गया है। किसानों ने सरकार से आकलन और मुआवजे की मांग की है।