लातूर : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. (Hailstorm Crop Damage)
अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर काही ठिकाणी गारपिटीने हजेरी लावली. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच आंब्याच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे.(Hailstorm Crop Damage)
सायंकाळी सुमारे ५ वाजल्यापासून हवामानात अचानक बदल झाला. दिवसभर उकाडा आणि कडक उन्हानंतर वातावरण ढगाळ झाले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह अर्धा तास मुसळधार पाऊस झाला, तर उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी परिसरात गारपिटीने शेतकरी हैराण झाले.
गारपिटीने वाढवला फटका
उदगीर, देवणी आणि आसपासच्या भागांत तब्बल अर्धा तास गारांचा पाऊस झाला. यामुळे उभी पिके आणि फळबागांना मोठे नुकसान झाले आहे.
विशेषतः आंब्याच्या बागांमधील मोहर गळून पडल्याने उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
रब्बी पिकांचे नुकसान
औसा तालुक्यातील किल्लारी, अहमदपूर तालुक्यातील किनगाव, औराद शहाजानी, खरोसा तसेच लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु.), गाधवड, टाकळी, जेवळी, काडगाव, खाडगाव, जोडजवळा, चांडेश्वर, पेठ, वासनगाव, कव्हा या भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गहू, हरभरा आणि ज्वारीच्या पिकांना फटका बसला आहे.
काढलेले पीकही भिजले
अनेक शेतकऱ्यांनी गहू, हरभरा व ज्वारीची काढणी करून काड शेतातच ठेवली होती. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे हे काड भिजले असून, त्याचे मोठे नुकसान झाले आहे.
आधीच काढणीच्या टप्प्यावर आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्याची भावना व्यक्त होत आहे.
शहरातही पावसाचा जोर
लातूर शहरातही सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
शेतीसमोर नवे संकट
यंदा रब्बी हंगाम चांगला येण्याची अपेक्षा असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. गारपीट, वादळी वारे आणि पावसामुळे पिकांचा दर्जा घसरण्याची शक्यता असून, उत्पादनावरही परिणाम होणार आहे.
अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. काढणीच्या तोंडावर झालेल्या या पावसामुळे आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता असून, पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
अधिक वाचा : Agriculture News : शेतकऱ्यांनो, सावध राहा; 'ही' आग हिरावतेय हातातोंडाशी आलेला घास!
Web Summary : A sudden hailstorm in Latur district has severely damaged rabi crops like wheat, gram, and sorghum, along with mango orchards nearing harvest. Farmers face significant financial losses as harvested crops got drenched. Immediate government assistance is needed after crop assessment.
Web Summary : लातूर जिले में अचानक ओलावृष्टि से रबी की फसलें जैसे गेहूं, चना और ज्वार, और कटाई के करीब आम के बागों को भारी नुकसान हुआ है। किसानों को भारी वित्तीय नुकसान का सामना करना पड़ रहा है क्योंकि काटी गई फसलें भीग गईं। फसल मूल्यांकन के बाद तत्काल सरकारी सहायता की आवश्यकता है।