Join us

अंबादास पवार यांच्या संघर्षाला शासनाची साथ; शेतकऱ्याच्या मदतीला मंत्री धावले वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 11:13 IST

हडोळती गावातील ७५ वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांनी ज्या धैर्याने आर्थिक संकटात शेती चालू ठेवली, त्यानी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन कोळपणी करणाऱ्या या शेतकऱ्याच्या मदतीला आता सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे धावले आहेत. त्यांना कर्जमाफी, सरकारी योजना आणि नोकरीचाही आधार दिला जाणार आहे.

हडोळती गावातील ७५ वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांनी ज्या धैर्याने आर्थिक संकटात शेती चालू ठेवली, त्यानी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन कोळपणी करणाऱ्या या शेतकऱ्याच्या मदतीला आता सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Cooperation Minister Babasaheb Patil) आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) धावले आहेत.

अहमदपूर (जि. लातूर) येथील बैलबारदाणाच नव्हे, तर कोळपणीसाठीही पैसे नसल्याने स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन शेती कसणाऱ्या हडोळती येथील वृद्ध शेतकरी अंबादास पवार यांना मदतीसाठी सहकारमंत्री व कृषी मंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना कर्जमाफी, सरकारी योजना आणि नोकरीचाही आधार दिला जाणार आहे.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जाची परतफेड करण्याचा विश्वास दिला आहे तर कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास गोविंद पवार (७५) यांची गावानजीक २ एकर ९ गुंठे शेती आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर आहे.

पवार यांनी उसनवारी करून शेतात कापसाची लागवड केली. पिकांतील तण काढण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी जू खांद्यावर घेतल्याचे वृत्त 'लोकमत' मधून प्रकाशित झाले होते. त्याची दखल सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेऊन तत्काळ मदतीसाठी धावले.

पंचाहत्तरी गाठलेले अंबादास पवार यांनी स्वताला कोळपणीच्या कामाला जुंपून घेतले आहे. सोबतीला पत्नी मुक्ताबाई होत्या.

सहकारमंत्र्यांनी जाणल्या अडीअडचणी

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अंबादास पवार यांच्याशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या.कर्जाची परतफेड आम्ही करू, त्याची चिंता करू नये. हंगामासाठी आवश्यक ती मदत केली जाईल. तसेच मुलास नोकरीही देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास दिला.

अधिकाऱ्यांनी घेतली भेट

प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी बुधवारी पवार यांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी जाणून घेत कृषी विभागाच्या वतीने आवश्यक ती मदत दिली जाईल, असे सांगितले. तर मंगळवारी पवार यांच्या घरी तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, मंडळ कृषी अधिकारी संदीप आयनुले, सहायक कृषी अधिकारी एस. एस. कदम यांनी जाऊन भेट घेतली.

हे ही वाचा सविस्तर :  मुक्ताबाईची सोबत, विठूची कृपादृष्टी; आमच्या घामाने फुलू दे रे पांडुरंगा ही 'पीकसृष्टी'

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीसरकारकृषी योजनालातूर