नंदुरबार :गहू पिकापासून निघालेला चाराम्हणजेच भुसा (Gahu Fodder) बऱ्याचदा शेतकऱ्यांकडून जाळला जातो. मात्र, हा चारा मशरूम लागवडीसाठी एक महत्त्वाचे माध्यम म्हणून वापरला जाऊ शकतो. म्हणून सुकवलेला स्वच्छ काडीकचरा व चारा घरामध्ये जतन करून ठेवावा, असे मशरूमचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी सांगितले.
मशरूम उत्पादनातून (Mushroom Farming) शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक मदत होत असल्याने अनेक अण त्याकडे वळत आहेत. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राजेंद्र वसावे म्हणाले की, मशरूमच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच, पण ते पर्यावरणाची हानी होण्यापासूनही वाचवू शकतात. गव्हाचा चारा (Wheat Fodder) जाळल्याने वायू प्रदूषण होते, तर मशरूमच्या लागवडीमुळे पर्यावरणाची हानी कमी होते.
मशरूम शेती ही नियोजनपूर्वक शेती असून, खराब झालेला चारा मशरूम कल्टिव्हेशनला चालत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा सुकविलेला चारा घरामध्ये जतन करून ठेवावा. मशरूम शेतीसाठी भाताचा चारा, गहू, दादर, ज्वारी, मकई, सोयाबीन, बाजरी, तूर, मूग व लाकूड आर्दीचा भुसा लागतो. कोणताही चारा नियोजनपूर्वक जतन करून ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
इतरही ठिकाणी वापर
मजुरांमार्फत गहू काढल्यानंतर त्याचा भुसा जनावरांना खाण्यासाठी वापरात येतो. झोपडी, गोठा शाकारण्यासाठी किंवा इंधन म्हणूनही त्याचा वापर होतो. मात्र, हार्वेस्टरने गव्हाची काढणी होते, तेव्हा भुसा हाताला लागत नाही. ते शेतातच भूस होऊन पडते.
अनेकांना मिळतो रोजगार...
शेतीला जोडधंदा म्हणून दुर्गम भागातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनेक शेतकरी मशरूम उत्पादन घेण्याकडे वळले आहेत. कमी खर्चात उत्पादन चांगले मिळत असल्याने शेतकरी मशरुमबाबत मार्गदर्शन घेऊन उत्पादन घेत आहेत. यामुळे दुर्गम भागातील अनेकांना रोजगारही मिळत आहेत.