- दिलीप दहेलकर
गडचिरोली : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबाग उपक्रमाला प्रोत्साहन देण्याकरिता परसबाग स्पर्धा (Backyard Garden) घेण्यात आली. या स्पर्धेत मुलचेरा तालुक्याच्या उदयनगर बांग्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला असून ५१ हजारांचे पारितोषिकही पटकावले आहे.
दुर्गम भागात येणारा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची (Gadchiroli District) ओळख आहे. याच जिल्ह्यातील झेडपी शाळेचे सध्या कौतुक होत आहे. उदयनगर येथील एक शिक्षकीय शाळेने विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून आदर्श परसबाग (Backyard Farming) फुलविली. विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या नवीन पोषण आहार नोंदवहिमध्ये राज्यस्तरीय परसबागमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या सदर शाळेच्या परसबागेचे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे.
उदयनगर शाळेच्या परसबागेमध्ये सेंद्रिय शेती पद्धतीद्वारे भाजीपाला, औषधी, वनस्पती, फळवर्गीय भाजी तसेच फळवर्गीय झाडे, वेलवर्गीय झाडांची लागवड करण्यात आली आहे. यात वांगी, केळी, लिंबू, भोपळा, कांदे, लवकी तसेच टोमॅटो या भाजीपाल्याची गावात व परिसरात विक्री करण्यात आली. यातून शाळेला हजारो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
शाळेसाठी अशी ठरतेय परसबाग फायदेशीर
परसबाग निर्मितीमुळे शाळेत मनमोहक व सौंदर्यपूर्ण आकर्षक वातावरण निर्माण झाले आहे. मध्यान्ह भोजनासाठी विद्यार्थ्यांना येथील पालेभाज्यांचा वापर आहारात करण्यात आला. स्थानिक पातळीवर भाजीपाल्याची विक्री करून आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यात आले. एकच शिक्षक व चार वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रमाने सुंदर अशी परसबाग फुलविल्याने विद्यार्थ्यांना श्रमदानाचे धडे मिळाले.
जैविक गांडूळ खत निर्मिती
परसबाग निर्मितीसाठी विटांची टाकी तयार करून गावात उपलब्ध गवत, तणीस, शेणाचा तसेच शाळेतील टाकाऊ पदार्थांचा वापर करून जैविक गांडूळ खत निर्मिती करण्यात आली. याशिवाय कडूलिंबाची फळे, पाने, फुले तसेच बेशरम जातीच्या झाडाची पाने, लसून, गोमूत्र, तीखट मिरची याचे मिश्रण तयार करून फवारणी केली.
या रोपट्यांची बागेत लागवड
उदयनगर जि.प. शाळेच्या परसबागेत निम, तुळशी, गिलोय, हिरडा, पुदीना, पाथरचट्टा, खानखुनी, एलोवेरा, फलीफूल व पिपुर्ली आदी औषधींची रोपटे लावण्यात आली आहेत. याशिवाय वांगी, टोमॅटोसह १६ प्रकारची फळवर्गीय भाजी तसेच १२ प्रकारची फळवर्गीय झाडे लावण्यात आली आहे. १५ प्रकारचे वेलवर्गीय तसेच विविध भाज्या तसेच इतर झाडांची लागवड केली आहे.