गडचिरोली : उन्हाळी हंगाम सुरू झाला, शेतकरी धानाचे उत्पादन (Paddy Farming) घेण्यासाठी साधनसामग्री गोळा करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. परंतु, हंगामाच्या सुरुवातीलाच कृषी केंद्र संचालकांनी महत्त्वाच्या रासायनिक खतांसोबत मागणी नसणाऱ्या खतांची विक्री जबरदस्तीने शेतकऱ्यांना करीत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli District) उन्हाळी हंगामात धान पिकांचे उत्पादन घेतले जाते. धान पिकाचे उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर शेतकरी करतात. रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. तसेच, मजुरांची मजुरी व इतर खर्चामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. धान पिकाच्या बाबतीत उत्पादन खर्च वाढला आहे. मात्र, भाव मिळत नसल्याने शेती करायची कशी, असा प्रश्न पडला आहे. अशातच कृषी केंद्र संचालकांनी आवश्यक असणाऱ्या खतांवर इतर अनावश्यक खतांची खरेदी (Purchase Fertilizer) करण्यासाठी जबरदस्ती करीत आहेत.
इतर खतांसोबत विक्रीआपल्या भागातील शेतकरी युरीया, २०-२०-०-१३, डीएपी या रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात करतात. याच खतासोबत नॅनो युरीया, नॅनो डीएपी, सल्फर, सूक्ष्म मूलद्रव्ये, कीटकनाशक इत्यादी खतांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जबरदस्तीने विक्री करीत आहेत. कृषी विभागाने याची चौकशी करावी. जे कृषी केंद्र संचालक अनावश्यक खताची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जबरदस्ती करीत असतील, अशा कृषी केंद्रावर कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खत कंपन्यांनी मागणी नसणारी खते कृषी केंद्र संचालकांना देऊ नये, असे पत्र कंपन्यांना देण्यात आले आहेत. तसेच नॅनो युरिया, नॅनो डीएपी खताचा वापर कसा करावा, त्याचे फायदे काय आहेत. हे कृषी केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांना पटवून द्यावे.- प्रीती हिरळकर, जिल्हा अधीक्षक कृषी, अधिकारी.
रासायनिक खतांवर कंपनीकडून लिंकिंग केलेल्या अनावश्यक खताची उचल कृषी केंद्र संचालकांना करावी लागते. त्याशिवाय डिलर खताचा पुरवठा करीत नाही. त्यामुळे कृषी केंद्र संचालकांना नाईलाजाने लिंकिंग केलेली खते शेतकऱ्यांना विक्री करावी लागते. याबाबत असोसिएशन मार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.- विनोद चिलबुले, सचिव, आरमोरी तालुका कृषी असोसिएशन