Join us

Agriculture News : शेतकऱ्याने तीन बिघ्यांतील मुगाच्या पिकावर रोटाव्हेटर फिरवला, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:37 IST

Agriculture News : 'पेरणीपासून मशागतीवर मोठा खर्च झाला. पण पीक ऐन फुलोऱ्यावर असताना पावसाचा खंड पडला.

जळगाव : अमळनेर तालुक्यातील नांदेडसह परिसरात पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची स्थिती दयनीय झाली आहे. पाण्याअभावी कपाशी, मका, सोयाबीन, मूग, तूर, ज्वारी, बाजरी, उडीद यांसारख्या पिकांवर कोमेजण्याची वेळ आली आहे. 

या भीषण परिस्थितीत अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील शेतकरी रवींद्रनाथ कदम यांनी हवालदिल होऊन आपल्या तीन बिघ्यांतील मुगाच्या पिकावर रोटाव्हेटर फिरवला. पिकाची पेरणी केल्यानंतर मशागतीसह आजपर्यंत जवळपास दहा हजार रुपयांचा खर्च झाला होता; मात्र पावसाच्या मोठ्या खंडामुळे मुगाचे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेतच फलधारणा न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

कदम यांनी सांगितले की, 'पेरणीपासून मशागतीवर मोठा खर्च झाला. पण पीक ऐन फुलोऱ्यावर असताना पावसाचा खंड पडला. फुलोरा गळून पडला आणि फलधारणा झाली नाही. त्यामुळे नाईलाजाने उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवावा लागत आहे.' नांदेड व परिसरातील मोठा भाग पावसाच्या प्रतीक्षेत असताना खरीप हंगाम धोक्यात आला आहे.

पिके ऐन फुलोऱ्यावर असताना पावसाचा खंडपिकांचे नुकसान भरपाईसाठी सरकारने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. नांदेड आणि सावखेडा भागात मागील १२ ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे.

विखरण परिसरात पानांचा रंग पिवळापावसाळा सुरू होऊन दोन-अडीच महिने उलटून गेले तरी विखरण परिसरात पाहिजे तसा जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. नद्या-नाल्यांना एकदाही पूर आलेला नसल्याने आणि पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके करपू लागली आहेत. यामुळे यावर्षी पावसाळा असाच निघून जातो की काय, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. 

शेतकऱ्यांनी मका, कापूस, ज्वारी, मूग, सोयाबीन यांसारखी पिके पेरून आता जवळपास दोन-अडीच महिने झाले. सुरुवातीला पावसाने फक्त पिकांना जगवेल एवढाच पुरवठा केला; मात्र गेल्या पंधरा दिवसांत एक थेंबही पाऊस न झाल्याने पिकांच्या पानांचा रंग पिवळसर होऊन ती करपू लागली आहेत. "यावर्षी पावसाने साथ दिली नाही, तर उत्पादनात निम्म्यापर्यंत घट येणार हे निश्चित आहे," असे शेतकरी रावसाहेब देवरे यांनी सांगितले.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीजळगावपाऊस