Join us

महाडीबीटीवर अर्ज करताय, सातबारा नसला तरी चालेल, 'हा' नंबर सांगा फक्त, मिनिटांत होईल काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:35 IST

Agriculture News : यापुढे सातबारा आणि ८ अ उतारा अपलोड करण्याची गरज नसल्याचे खुद्द कृषी आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

जळगाव : महाडीबीटी पोर्टलवरून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ दिला जातो. त्यासाठी सातबारा आणि ८ अ उतारा अपलोड करावा लागतो. मात्र आता ॲग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) भरल्यानंतर शेतकऱ्याची माहिती अर्जात उपलब्ध होत आहे. 

त्यामुळे योजनांच्या अर्जाची पडताळणी करताना यापुढे सातबारा (Satbara) आणि ८ अ उतारा अपलोड करण्याची गरज नसल्याचे खुद्द कृषी आयुक्तांनी स्पष्ट केल्याने 'फार्मर आयडी' प्राप्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनांमध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर लाभदेण्यात येत असल्याने या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

मंजुरी जलदगतीने, शेतकऱ्यांना दिलासाअर्ज परत पाठविल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर हे निर्देश दिले आहेत. काही ठिकाणी सहायक कृषी अधिकारी किंवा इतर अधिकाऱ्यांकडून सातबारा, आठ अ उताऱ्याची मागणी होत होती. काही शेतकरीसुद्धा याबाबत अनभिज्ञ असल्याने सातबारा व आठ अ घेऊन पोर्टलवर अपलोड करत होते. यानंतर ही कागदपत्रे देण्याची गरज नाही. या संदर्भात क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत लाभार्थी निवड  महाडीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. यंदापासून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅकचा शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. त्यानुसार महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी नोंदणी या ओळख क्रमांकाच्या माध्यमातून करीत आहेत.

लाभार्थी निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सहायक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत अर्जाची व कागदपत्रांची छाननी करण्यात येते. मात्र, ही छाननी करताना शेतकऱ्यांचा सातबारा, ८ अ उतारा व आधार क्रमांक ही कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड न केल्यामुळे क्षेत्रीय स्तरावरून त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी काढून माघारी पाठविले जात होते. 

टॅग्स :कृषी योजनाशेतीशेती क्षेत्रशेतकरी