मंगरुळपीर (जि. वाशिम) : 'मनरेगा योजने'अंतर्गत फळबाग लागवडीच्या थकीत अनुदानाबाबत विचारणा करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याशी अर्वाच्य भाषेत वागून त्याला बुटाने मारहाण व धमकी दिल्याच्या गंभीर प्रकारात मंगरुळपीर येथील तालुका कृषी अधिकारी सचिन भास्कर कांबळे यांना महाराष्ट्र शासनाने तत्काळ निलंबित केले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत कृषी आयुक्तांच्या शिफारशीनंतर ही कारवाई करण्यात आली.
मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी १३ जानेवारी रोजी 'मनरेगा योजने'अंतर्गत फळबाग लागवडीसाठी मंजूर झालेल्या अनुदानाचा हप्ता अद्याप मिळालेला नसल्याने तालुका कृषी कार्यालयात चौकशी केली होती.
यावेळी संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्याशी उद्धटपणे संवाद साधत अर्वाच्य भाषा वापरली. यानंतर संतापलेल्या अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. प्रकरणाची माहिती 'लोकमत'ने १४ जानेवारी रोजी 'शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण' केल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत शासनाने चौकशी सुरू केली.
महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी नितीन शेळके यांनी १७ जानेवारी रोजी जारी केलेल्या निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे की, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांचे वर्तन हे शासकीय शिस्तीला धरून नसून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम ३ चे उल्लंघन करणारे आहे.
अशा प्रकारचे वर्तन प्रशासकीय दृष्टिकोनातून अस्वीकारार्ह असून, त्यामुळे कृषी विभागाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
निलंबन कालावधीत सचिन कांबळे यांचे मुख्यालय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम कार्यालय येथे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे.
शेतकऱ्याशी झालेल्या या गैरवर्तनामुळे कृषी विभागावर सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अखेर कृषी आयुक्तांच्या शिफारशीनंतर शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करत कठोर पावले उचलली आहेत.
Web Summary : An agricultural officer in Mangrulpir was suspended after assaulting a farmer with a shoe over delayed subsidy payments. The incident sparked outrage and prompted swift action from the Maharashtra government following an investigation. The officer's conduct violated government service rules.
Web Summary : मंगरुलपीर में एक कृषि अधिकारी को बकाया सब्सिडी भुगतान को लेकर एक किसान को जूते से मारने के बाद निलंबित कर दिया गया। इस घटना से आक्रोश फैल गया और जांच के बाद महाराष्ट्र सरकार ने त्वरित कार्रवाई की। अधिकारी का आचरण सरकारी सेवा नियमों का उल्लंघन था।