- कृष्णा अष्टेकर नाशिक : गतवर्षी जिल्ह्यात अति मुसळधार झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला तीन ते चार वेळेस पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील शेतजमिनीसह पिके पाण्याखाली राहिल्याने उसाचे पाच हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले.
शेतात जास्त काळ पाणी राहिल्याने जमिनीतील क्षार वाढून शेतजमीन नापिकी होऊ लागली आहे. परिणामी शेतजमीन नापिकी झाल्याने ऊस पिकाला कारखाने तोडण्यास तयार नसल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे.
निफाडच्या दक्षिण भागाला गोदावरी नदीचा प्रचंड मोठा किनारा लाभल्याने या भागातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली असून बागायती आहे. या भागात ऊस या बारमाही पिकासह अनेक पिकांची पारंपरिक शेती केली जाते. दरवर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. येथील पश्चिम भाग हा पावसाचे माहेरघर म्हणून ओळखला जातो.
या भागात अनेक नद्या व धरण प्रकल्पातील पाणी गोदावरीला सोडले जाते. परिणामी गोदावरी नदीला पूरपरिस्थिती निर्माण होऊन दरवर्षी या भागातील सायखेडा, चांदोरी, शिंगवे, गोंदेगांव, करंजगाव, कोठुरे, चापडगात, मांजरगाव, कुरडगाव व सुंदरपूर आदी गावांना पुराचा फटका बसतो. पुराचे पाणी शेतात आल्याने ऊस, सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान होत असते.
दोन्ही बाजूंनी शेतकरी भरडला जातोयगेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे भरपूर नुकसान झाले व उत्पन्नातही घट झाली. परिसरातील व बाहेरील अनेक कारखान्यांचे ऊसतोड कामगार असतानासुद्धा आर्थिक देवाण-घेवाण करूनच ऊस तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. एकीकडून निसगनि शेतकऱ्यांवर केलेला अन्याय व दुसरीकडून कारखान्याकडून होणारी लूट यामध्ये दोन्हीही बाजूने शेतकरी भरडला गेला.
क्षाराचे प्रमाण वाढतेदरवर्षी गोदावरीला पूरपरिस्थिती निर्माण होते. यात मोठे नुकसान होते. सन २०१६ व २०१९ मध्ये महापूर आला होता, तेव्हा खूप मोठे नुकसान झाले होते. येथील शेतजमिनीत क्षाराचे प्रमाण वाढून जमिनी नापिकी झाल्या आहेत.
गतवर्षी मेपासून सुरू झालेल्या पावसाने ऑक्टोबरपर्यंत मुक्काम केल्याने गोदावरीला पूरपरिस्थिती निर्माण झाली. अधिक काळ पाणी शेतात राहिल्याने जमिनीत क्षाराचे प्रमाण वाढले. जमिनी नापिकी झाल्या. उसाच्या मुळ्यांची वाढ खुंटली. कारखाना ऊस तोडणीला तयार नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
- विष्णू मोगल, शेतकरी, कोठुरे