Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dhan Kharedi : उद्दिष्ट संपलं म्हणून खरेदी बंद; पण धान विकायचं कुठे? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:48 IST

Dhan Kharedi : शासनाने उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत धान खरेदीला अचानक ब्रेक लावल्याने भिवापूर तालुक्यातील १,१६५ शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तब्बल १८ हजार क्विंटल धान घरात पडून असून पुढील शेतीकामांसाठी भांडवल कसे उभे करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वाढीव उद्दिष्ट मंजूर होऊन खरेदी केंद्रे पुन्हा सुरू होणार का? जाणून घ्या संपूर्ण घडामोडी… (Dhan Kharedi)

शरद मिरे

शासकीय आधारभूत धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने खरेदी प्रक्रिया अचानक थांबवल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. (Dhan Kharedi)

एकट्या भिवापूर तालुक्यातील १,१६५ शेतकऱ्यांचे तब्बल १८ हजार क्विंटल धान सध्या घरातच पडून आहे. शासन खरेदी पुन्हा सुरू करेल, या आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे.(Dhan Kharedi)

नोंदणी १,२८४ शेतकऱ्यांची; खरेदी फक्त ११९ ची

भिवापूर खरेदी-विक्री संस्थेकडे तालुक्यातील १,२८४ धान उत्पादक शेतकऱ्यांनी पूर्वनोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात केवळ ११९ शेतकऱ्यांचा ३,५७४.८० क्विंटल धान खरेदी करण्यात आला.

जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत ८ जानेवारीपासून खरेदी थांबवण्यात आली. परिणामी उर्वरित १,१६५ शेतकऱ्यांचे धान विक्रीअभावी अडकून पडले आहे.

विशेष म्हणजे, ६५ शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर आणून ठेवले असून ते महिनाभरापासून तिथेच पडून आहे.

जिल्हास्तरावरही गंभीर स्थिती

नागपूर जिल्ह्यासाठी शासनाने मंजूर केलेले ९८,१४६.६८ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट ७ जानेवारीला पूर्ण झाल्याने दुसऱ्या दिवसापासून सर्व खरेदी केंद्रे बंद करण्यात आली.

जिल्ह्यात एकूण ४६,९६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असली तरी आतापर्यंत फक्त २,६१६ शेतकऱ्यांचा माल खरेदी झाला आहे. म्हणजेच अद्याप ४४,३४७ नोंदणीकृत शेतकऱ्यांचे धान घरातच पडून आहे.

वाढीव ५ लाख क्विंटल उद्दिष्टाची मागणी

या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी १७ जानेवारी रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र देत ५ लाख क्विंटल वाढीव उद्दिष्ट देण्याची मागणी केली आहे.

तसेच खरेदी-विक्री संस्थेचे सभापती भास्कर येंगळे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सर्व खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.

११९ शेतकऱ्यांना ८४ लाखांचा लाभ

शासकीय आधारभूत भावानुसार २,३६९ रुपये प्रति क्विंटल दराने ११९ शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले. या व्यवहारातून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात ८४ लाख ६८ हजार ६७८ रुपये जमा करण्यात आले आहेत.

मात्र उर्वरित शेतकऱ्यांना विक्रीअभावी पुढील शेतीकामांसाठी भांडवल उभे करणे कठीण झाले आहे. 'धान विकल्याशिवाय शेती आणि संसाराचा गाडा कसा चालवायचा?' असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

शेतकऱ्यांची मागणी काय?

* तात्काळ धान खरेदी पूर्ववत सुरू करावी

* वाढीव उद्दिष्ट मंजूर करावे

* सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा

उद्दिष्ट संपल्याचे कारण देत खरेदी थांबवण्यात आल्याने भिवापूरसह नागपूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वाढीव उद्दिष्ट मंजूर होऊन खरेदी केंद्रे पुन्हा सुरू होणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Harbhara Kharedi : बाजारात कमी दर, खरेदी केंद्र बंद; हरभरा विकायचा कुठे?

अधिक वाचा : Makka kharedi : नोंदणी झाली, एसएमएस नाही; हजारो क्विंटल मका पडून वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Paddy Procurement Halted: Farmers Anguished Over Sales Amidst Closed Centers

Web Summary : Paddy procurement stopped due to target completion, leaving farmers in Nagpur district distressed. Thousands of quintals remain unsold, causing financial strain. Farmers demand immediate resumption of procurement and increased targets to alleviate their plight.
टॅग्स :शेती क्षेत्रभातशेतकरीशेती