राहुल पेटकर
धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी घोषित केलेला बोनस नऊ महिन्यांनंतरही बहुतांश शेतकऱ्यांच्या हाती पोहोचलेला नाही. रामटेक तालुक्यातील तब्बल ९ हजार ५९५ शेतकरी अजूनही पैशाच्या प्रतीक्षेत असून, नवीन हंगामात मशागत करण्यासाठी त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. (Dhan Bonus)
राज्य सरकारने २०२४-२५ च्या खरीप हंगामात धान उत्पादकांसाठी प्रतिहेक्टर २० हजार रुपयांचा बोनस जाहीर केला होता. पण प्रत्यक्षात हा बोनस मिळण्यासाठी शेतकऱ्यांना नऊ महिन्यांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे. (Dhan Bonus)
मार्च २०२५ मध्ये बोनसचा आदेश काढूनही, अद्याप ९ हजार ५९५ शेतकऱ्यांच्या हाती एकही रुपया पोहोचलेला नाही.(Dhan Bonus)
नोव्हेंबर २०२४ पासून धान खरेदी केंद्रे सुरु झाली होती. पणन महामंडळ व आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून एमएसपी (MSP) दराने साधारण धान २ हजार ३०० रु. प्रतिक्विंटल व ‘ए’ ग्रेड धान २ हजार ३२० रु. प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्यात आले. सरकारने दोन हेक्टर मर्यादेपर्यंत बोनस देण्याची अट घातली.(Dhan Bonus)
रामटेक तालुक्यात १० हजार ३२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली, पण केवळ ६३४ जणांना बोनस मिळाला.
उर्वरित हजारो शेतकऱ्यांना नवीन हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले तरीही पैसे मिळालेले नाहीत. त्यात काही शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे ब्लॉक करून ठेवण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या हाती या हंगामात केवळ पंतप्रधान सन्मान निधीचे दोन हजार रुपयेच आले आहेत. या दोन हजार रुपयांत मशागत कशी करायची? असा संतप्त प्रश्न ते विचारत आहेत.
मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीही अद्याप मिळालेला नाही. कर्जासाठी बँका नकार देत असल्याने आणि बोनसाची टाळाटाळ होत असल्याने काही शेतकरी आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचले आहेत.