नागपूर : विधानसभेत काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पणनमंत्री जयकुमार रावल यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यांनी सभागृहात सोयाबीनच्या रिजेक्ट पिशव्या ठेवत असा दावा केला की 'अखिल' हा खासगी व्यक्ती सोयाबीन खरेदी केंद्र उघडण्यासाठी चार लाखांची मागणी करीत आहे.
वडेट्टीवार यांनी सांगितले, खरेदी केंद्रावर सोयाबीन अधिकाऱ्यांनी हे योग्य मानले, परंतु गोदामात हा माल रिजेक्ट करण्यात आला. या प्रकरणात अखिलचे संबंध जयकुमार रावल यांच्या ओएसडीशी आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही सदस्यांकडून माहिती घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
राज्यात सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी पैसे घेत आहेत. बीड येथील अखिल नावाची व्यक्ती यासाठी वसुली करत आहे. शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी केला जात नसल्याने शेतकऱ्यांनी जगावे की मरावे? असा सवाल यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन नाकारला जात आहे. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख रुपयांची मागणी करत असून बीड येथील खासगी व्यक्ती अखिल पैशाची वसुली करत आहे.
यावेळी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा नाकारला गेलेला सोयाबीन थेट दाखविण्यात आला. चांगल्या दर्जाचा सोयाबीन देखील जर सोयाबीन खरेदी केंद्रावर नाकारला जात असेल तर शेतकऱ्यांनी जगावे की मरावे? शेतकऱ्यांच्या विषयावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यावर सरकार गांभीर्याने घेत नाही. विदर्भात अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
