Join us

Crop Pattern : पावसाचे टायमिंग हुकले; 'या' जिल्ह्यात मूग-उडदाच्या पेरणीला जोरदार फटका वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 09:10 IST

Crop Pattern : बुलढाणा जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पावसाचे टायमिंग चुकल्यामुळे मूग व उडदाच्या पेरणीत तब्बल ६५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात पेरणीसाठी पोषक पाऊस न मिळाल्याने ज्वारी आणि कापसाच्या पेरणीतही घसरण झाली आहे.(Crop Pattern)

Crop Pattern : बुलढाणा जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पावसाचे टायमिंग चुकल्यामुळे मूग व उडदाच्या पेरणीत तब्बल ६५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात पेरणीसाठी पोषक पाऊस न मिळाल्याने ज्वारी आणि कापसाच्या पेरणीतही घसरण झाली आहे. (Crop Pattern)

मात्र, सोयाबीनने यंदाही शेतकऱ्यांचा आधार ठरवत ८७ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. मृग नक्षत्रात मूग, उडदाची पेरणी पोषक मानली जाते; परंतु यंदा जिल्ह्यात मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने २ जुलै पर्यंत जिल्ह्यात मूग व उडदाच्या पेरणीत ६५ टक्क्यांनी घट झाल्याचे पेरणी अहवालावरून समोर आले. (Crop Pattern)

गेल्यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. यंदा पुन्हा नव्या जोमाने शेतकरी खरीपाच्या तयारीला लागले. सुरूवातीलाच मे महिन्यात पावसाने फटका दिला होता. त्यानंतर जून महिन्यात प्रारंभीच पावसाने दडी मारल्याने पेरण्यास विलंब झाला.  (Crop Pattern)

मूग, उडदाच्या पेरणीसाठी मृग नक्षत्र योग्य मानले जाते; परंतु मृग नक्षत्रच कोरडे गेले. २५ व २६ जून रोजीच्या पावसाने शेतकऱ्यांना तारले. त्यानंतरही कमीअधिक प्रमाणात झाला; परंतु तोपर्यंत मूग व उडीद पेरणीचा हंगाम जवळजवळ संपत आल्याने शेतकऱ्यांनी अन्य पिकांना पसंती दिली.

ज्वारी पेरणीतही घट

जिल्ह्यात ५ हजार ६४९ हेक्टरवर खरीप ज्वारीची पेरणी अपेक्षित असताना, २ जुलैअखेर केवळ ६.८ हेक्टरवर पेरणी झाली. याची टक्केवारी ही ६.८ आहे.

सोयाबीनची ८७.६ टक्के पेरणी आटोपली !

जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार ०४१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी अपेक्षित आहे. २ जूनपर्यंत ३ लाख ४७ हजार ७२९ हेक्टरवर पेरणी झाली असून, याची टक्केवारी ८७.६ आहे. कपाशीची लागवड १९ हजार ७६३९ हेक्टरवर अपेक्षित असून, प्रत्यक्षात ११ हजार ६१३३ हेक्टरवर लागवड झाली. त्याची टक्केवारी ही ५८.८ टक्के आहे. गेल्या दोन दशकापासून जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी या पिकाला प्राधान्य देत आहे. या पिकाच्या खालोखाल जिल्ह्यात कापसाचा पेरा होत असतो.

७९.५२ टक्के खरीप पेरणी

जिल्ह्यात ७ लाख ३७ हजार ०७८ हेक्टरवर खरीप पेरणी अपेक्षित असून, २ जुलैपर्यंत ५ लाख ८६ हजार १४८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ७९.५२ आहे.

हवामान बदलाचाही जाणवतोय परिणाम

हवामान दृष्ट्या बुलढाणा जिल्हा संवेदनशील आहे. त्यामुळे गेल्या काही काळात शेतकऱ्यांचा कलही त्यामुळे बदललेला आहे. कधी काळी कापसाचा पेरा जिल्ह्यात अधिक होत होता. आता परिस्थिती बदलली आहे.

परतीचा पाऊसही जिल्ह्यात आता रेंगाळत असून ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पाऊस बरसतो. त्यामुळे त्यावेळी खरीपाच्या पिकाचे नुकसान होत आलेले आहे. २०१८ नंतर हा पॅटर्न जिल्ह्यात बदल्याने वेळेत पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा आता कल झाला आहे. पीक पद्धतीही त्यामुळे बदलत आहे.

मूग उडदाचा पेरा घटला!

जिल्ह्यात मूग १३ हजार ९३८ हेक्टर तर उडदाची पेरणी १४ हजार ७८४ हेक्टरवर अपेक्षित आहे. २ जुलैअखेर जिल्ह्यात मूग ४ हजार ९१० हेक्टरवर (३५.२ टक्के) तर उडदाची पेरणी ५  हजार २१७ हेक्टरवर (३५.३ टक्के) झाली होती. दिवसेंदिवस हा पेरा कमी होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Crop Loan : पेरणी आटोपली; पण पीककर्ज वाटपाची गाडी रेंगाळली वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रपीकमूगसोयाबीनकापूसबुलडाणापाऊसहवामान अंदाजखरीपज्वारी