योगेश देऊळकार
बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीचा पॅटर्न झपाट्याने बदलतो आहे. गेल्या तीन वर्षांत कापूस पिकाचे क्षेत्र तब्बल ७५ हजार ४०७ हेक्टरने कमी झाले असून, सोयाबीनने मात्र चार लाख हेक्टरचा टप्पा कायम राखला आहे.(Crop Pattern Change)
कपाशीची घटती स्थिती
२०२३-२४ मध्ये कापसाची लागवड २ लाख २ हजार ९९७ हेक्टर होती. २०२४-२५ मध्ये हे क्षेत्र १ लाख ७० हजार हेक्टरवर आले, तर यंदा (२०२५-२६) फक्त १ लाख २७ हजार ५९० हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे. म्हणजेच तीन वर्षांत कापसाच्या लागवडीत जवळपास ३७ टक्के घट नोंदली गेली आहे. (Crop Pattern Change)
सोयाबीनचे वर्चस्व
सोयाबीन पिकाने सलग तिसऱ्या वर्षीही आपली पकड मजबूत ठेवली आहे.
२०२३-२४ : ४,१८,१२८ हेक्टर
२०२५-२६ : ४,३८,८६७ हेक्टर
कमी उत्पादन खर्च, कमी श्रम, तेल उद्योगातील स्थिर मागणी आणि तत्काळ रोकड व्यवहार या कारणांमुळे शेतकऱ्यांचा झुकाव सोयाबीनकडे वाढतो आहे.
वस्त्रोद्योगावर परिणामाची शक्यता
कृषितज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कपाशीचे क्षेत्र अशा पद्धतीने घटत राहिले तर येत्या काही वर्षांत कापसाचे उत्पादन कमी होऊ शकते. यामुळे वस्त्रोद्योगावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कपाशीचे उत्पादन वाढवण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर योजना राबवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
तीन वर्षांतील लागवडीची आकडेवारी
वर्ष | कापूस (हेक्टर) | सोयाबीन (हेक्टर) |
---|---|---|
२०२३-२४ | २,०२,९९७ | ४,१८,१२८ |
२०२४-२५ | १,७०,००० | — |
२०२५-२६ | १,२७,५९० | ४,३८,८६७ |
कापूस पिकाचे घटते क्षेत्र शेतकऱ्यांच्या व्यावहारिक गणिताचे प्रतिबिंब आहे. खर्चिक कापूस पिकापेक्षा सोयाबीन अधिक नफ्याचे ठरत असल्यामुळे सोयाबीनचे वर्चस्व आगामी काही वर्षे कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शेतकऱ्यांची बदलती मानसिकता
पूर्वी आम्ही फक्त कपाशीवर भर द्यायचो. पण सततच्या फवारण्या, कीड-रोग आणि खर्चामुळे नफा कमी झाला. उलट सोयाबीन कमी खर्चात येते आणि लगेच विक्रीही होते. त्यामुळे आता बहुतेक शेतकरी सोयाबीनकडे वळत आहेत. - गोपाल वानखडे, शेतकरी, खेर्डा