Join us

Crop Damage : अतिवृष्टीचा तडाखा! यवतमाळ जिल्ह्यात पावणेदोन लाख हेक्टरवरील पिके मातीमोल वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 15:53 IST

Crop Damage : पावसाने यवतमाळ जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. पावणेदोन लाख हेक्टरवरील पिके मातीमोल झाली, तर १,०४० गावांतील शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. शासनाची मदत केवळ दोन हेक्टरपुरती मर्यादित असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. (Crop Damage)

रूपेश उत्तरवार

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटांचा डोंगर कोसळला आहे. जूनपासून सतत सुरू असलेल्या अतिवृष्टी, पूर आणि अनियमित पावसामुळे पावणेदोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. (Crop Damage)

जिल्ह्यातील तब्बल १ हजार ४० गावांना याचा मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, शासनाकडून केवळ दोन हेक्टरपर्यंतच मदत मिळणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.(Crop Damage)

मदत 'तोकडी'च राहणार

पूर व अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या शेतशिवारातील सुपीक माती वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी गाळ साचल्याने पीक मातीमोल झाले आहे. या जमिनींवर पुन्हा शेती करणे अवघड झाले असून शेतकऱ्यांकडे पिकांची पुनर्लागवड करण्यासाठी पैसा नाही. 

'एनडीआरएफ'च्या निकषांनुसार कोरडवाहू क्षेत्राला हेक्टरी फक्त ८ हजार ५०० रुपये, बागायतीला १७ हजार, तर बहुवार्षिक पिकांसाठी २२ हजार ५०० रुपये इतकीच मदत मंजूर होणार आहे. 

खरडून गेलेल्या जमिनीसाठी १८ हजार, तर कायमचे नुकसान झालेल्या क्षेत्राला ४७ हजार रुपये हेक्टरी मदत आहे. परंतु या रकमा झालेल्या प्रचंड नुकसानीच्या तुलनेत अत्यंत अपुऱ्या आहेत.

नुकसानीचा आढावा

जून २०२५ : १३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ३० गाव प्रभावित; २५ लाखांची मदत प्रस्तावित.

जुलै २०२५ : १,२१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान; एक कोटी तीन लाख रुपयांचा प्रस्ताव.

ऑगस्ट २०२५ : तब्बल १ लाख ६४ हजार ९६२ हेक्टरवर पिकांचे नुकसान; अहवाल अद्याप अपूर्ण, पण नुकसान कोट्यवधींमध्ये.

शासनाच्या निकषांनुसार अंतिम मदत अत्यल्प राहणार असून, पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षाही ती कमी असल्याची नाराजी शेतकऱ्यांत आहे.

आत्महत्यांचे सत्र कायम

आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आत्महत्येचे सावट गडद होत आहे. यंदा केवळ नऊ महिन्यांत २२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील ५९ प्रकरणांची चौकशी प्रलंबित असून, ७८ प्रकरणे मदतीस अपात्र ठरली आहेत. गेल्या २५ वर्षांत जिल्ह्यात तब्बल ६ हजार ३९६ शेतकरी मृत्यूला कवटाळले आहेत.

शेतकऱ्यांची मागणी

शासनाकडून मदतीची गती वाढवून वास्तविक नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. तसेच पूरग्रस्त शेतजमिनी पुनर्वसनासाठी विशेष आर्थिक तरतूद करावी, अशी अपेक्षा आहे.

हे ही वाचा सविस्तर : Crop Damage : तीन महिन्यांत पाच लाख हेक्टरवरील पिकांची माती; पंचनाम्यांची गती मंदावली वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीयवतमाळपाऊस