Join us

Agriculture News : अवकाळीने शेती पाण्यात, कृषी सहाय्यक आंदोलनात, पंचनामे कधी होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:20 IST

Agriculture News : राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने (Avkali Paus) हजेरी लावली आहे. यात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Agriculture News :  मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने (Avkali Paus) हजेरी लावली आहे. यात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नुकसानीचा पंचनामा (Nuksan Panchname) होण्याच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र कृषी सहाय्यक आंदोलनात असल्याने आता या नुकसानीचे पंचनामे करणार कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

राज्यभरात सुरु असलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या तोंडचे पळवले आहे. शेतातील अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होणे आवश्यक आहे. असे असताना दुसरीकडे राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यासाठी ५ मे पासून आंदोलन सुरु आहेत. त्यामुळे पंचनाम्याची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. 

कृषी सहायकांअभावी पंचनाम्यात होतेय कोंडीप्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील कृषी सहायकांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. तशातच 'अवकाळी'ने मोठा फटका दिला. जळगाव जिल्हाभरात ७ हजारांवर हेक्टर क्षेत्र बाधित झाले असताना पंचनाम्यांचे काम ७२ तासांनंतरही पूर्ण होऊ शकलेले नाही. कृषी सहायकांचे 'काम बंद' सुरू असल्याने ही अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. पंचनाम्यांची प्रक्रिया लांबतच चालल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यात हजारो हेक्टरवरील नुकसान मागील तीन चार दिवसांपासून सुरु असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतीचे नुकसान केले आहे. जळगाव जिल्ह्यातील केळीच्या बागा, नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच इतरही पिकांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत पंचनामे होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. तर दुसरीकडे कृषी सहाय्यक १५ मे पर्यंत काम बंद आंदोलनात आहेत. त्यामुळे शेतकरी नाराज असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रपाऊसशेतीहवामान अंदाजपीक विमा