Join us
Daily Top 2Weekly Top 5

Cotton Farming : यंदा कापसाचाच जलवा; १२ लाखांहून अधिक बीटी पाकिटांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:26 IST

Cotton Farming : कापसाला मिळत असलेल्या विक्रमी दरामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात कपाशी लागवडीकडे वळताना दिसत आहे. अमरावती जिल्ह्यात कपाशी क्षेत्रात तब्बल २० हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून बीटी बियाण्यांच्या १२.४० लाख पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. काही लोकप्रिय वाणांच्या तुटवड्याची आणि काळाबाजाराचीही चर्चा सुरू झाली आहे.(Cotton Farming)

अमरावती : खरीप हंगाम अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी आणि कृषी विभागाची लगबग वाढली आहे.(Cotton Farming) 

यंदा कापसाला मिळत असलेल्या विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात कपाशी लागवडीकडे वळताना दिसत आहे.(Cotton Farming)

परिणामी, जिल्ह्यात कपाशी क्षेत्रात किमान २० हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने बीटी कपाशी बियाण्यांच्या तब्बल १२.४० लाख पाकिटांची मागणी नोंदविली आहे.

सध्या खासगी बाजारात कापसाचे दर प्रतिक्विंटल ९,७०० रुपयांवर पोहोचले असून हा आतापर्यंतचा उच्चांकी दर मानला जात आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ, रुई आणि सरकीच्या मागणीत झालेली वाढ या कारणांमुळे कापसाच्या दरात सातत्याने तेजी दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी यंदा सोयाबीनऐवजी कपाशीला अधिक प्राधान्य देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तालुकानिहाय बीटी बियाण्यांचे नियोजन

कृषी विभागाने यंदाच्या खरीपासाठी तालुकानिहाय बीटी कपाशी बियाण्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार अमरावती तालुक्यासाठी ७० हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. भातकुली तालुक्यासाठी ७१ हजार ५००, नांदगाव खंडेश्वरसाठी ३५ हजार, चांदूर रेल्वेसाठी ३७ हजार ५००, धामणगाव रेल्वेसाठी १ लाख ५ हजार, तिवसासाठी ७६ हजार, मोर्शीसाठी दीड लाख, वरुडसाठी १ लाख ३७ हजार ५००, चांदूर बाजारसाठी ८२ हजार ५००, अचलपूरसाठी ८५ हजार, अंजनगाव सुर्जीसाठी १ लाख, दर्यापूरसाठी सर्वाधिक २ लाख ६० हजार, धारणीसाठी ३० हजार आणि चिखलदऱ्यासाठी १० हजार पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.

लोकप्रिय वाणाच्या तुटवड्याची शक्यता

संकरित कपाशीच्या एका विशिष्ट वाणाला यंदाही मोठी मागणी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

गतवर्षी या वाणाच्या बियाण्यांची विक्री पोलिस बंदोबस्तात करावी लागली होती. यंदाही मागणी प्रचंड वाढल्याने संबंधित वाणाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

विशेषतः खारपाणपट्ट्यात एका खासगी कंपनीच्या दोन वाणांची मागणी झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर इतर भागांतही या वाणांची मागणी वाढल्याने काळाबाजार होण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे कृषी विभागासमोर पुरेशा बियाण्यांचा साठा उपलब्ध ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

पीकनिहाय प्रस्तावित क्षेत्र

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनचे प्रस्तावित क्षेत्र २ लाख ४८ हजार ९५६ हेक्टर इतके आहे. 

कपाशीचे क्षेत्र २ लाख ५० हजार हेक्टर प्रस्तावित करण्यात आले असून, तूर १ लाख २० हजार हेक्टरवर घेतली जाणार आहे. याशिवाय मूग-उडीद, ज्वारी, मका, धान आणि भुईमूग पिकांचेही मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे.

कपाशीच्या वाढत्या दरामुळे यंदाचा खरीप हंगाम कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, बियाण्यांचा तुटवडा आणि संभाव्य काळाबाजार टाळण्यासाठी कृषी विभागाने वेळेत नियोजन करणे आवश्यक असल्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Cotton Farming Alert : कापूस शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी सरकारचे नवे नियोजन

अधिक वाचा : Cotton Market : अबब! कापसाच्या दराने घेतली मोठी झेप; ८ दिवसांत हजाराची वाढ

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसशेतकरीशेतीखरीप