Cotton Farming Alert : खरीप हंगाम २०२६ साठी राज्य शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे नियोजन जाहीर केले आहे. (Cotton Farming Alert)
कापसावरील गुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापूस बियाण्यांची विक्री आणि लागवडीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, शेतकऱ्यांना १५ मेनंतरच कृषी सेवा केंद्रांमार्फत बियाणे उपलब्ध होणार आहेत. तसेच १ जूननंतर आणि पुरेसा पाऊस झाल्यानंतरच प्रत्यक्ष लागवड करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभागाने ८ मे २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रात याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
मागील काही वर्षांत गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा सुरुवातीपासूनच लागवड नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला आहे.
बियाणे पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर
शासनाच्या नियोजनानुसार कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांकडून १ ते १० मेदरम्यान वितरकांना पुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतर वितरकांकडून किरकोळ विक्रेत्यांना बियाणे उपलब्ध करून दिले जाईल. शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष विक्री १५ मे २०२६ पासून कृषी सेवा केंद्रांमार्फत सुरू होणार आहे.
कृषी विभागाने स्पष्ट केले की, बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये तसेच जादा दराने विक्री होऊ नये यासाठी प्रशासन विशेष सतर्क राहणार आहे.
जिल्हा आणि तालुका स्तरावर देखरेख ठेवून बियाण्यांचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
१ जूननंतरच कापूस लागवडीचे निर्देश
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी घाईत लागवड करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार १ जूननंतरच प्रत्यक्ष कापूस लागवड करावी. तसेच किमान १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे योग्य राहील, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
वेळेपूर्वी लागवड केल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे हवामान, पावसाची स्थिती आणि कीड व्यवस्थापन लक्षात घेऊनच लागवडीचा निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन
कापूस बियाणे विक्री १५ मेपासून कृषी सेवा केंद्रांमार्फत सुरू होणार आहे. गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी शासनाने हे नियोजन केले आहे. तसेच १ जूननंतर आणि १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. - तुषार जाधव, जिल्हा कृषी विकास अधिकारी
बोंडअळीमुळे आधी झाले होते मोठे नुकसान
गेल्या काही हंगामांत गुलाबी बोंडअळीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते.
उत्पादनात घट, वाढलेला फवारणी खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकरी संकटात सापडले होते. त्यामुळे यंदा शासनाने सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे
कापूस बियाणे विक्री : १५ मे २०२६ पासून
विक्री ठिकाण : कृषी सेवा केंद्र
लागवडीची शिफारस : १ जूननंतर
पेरणीपूर्व अट : किमान १०० मिमी पाऊस
उद्देश : गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करणे
प्रशासनाची भूमिका : जादा दर व कृत्रिम टंचाईवर नियंत्रण
हे ही वाचा सविस्तर : Cotton Farming : कापूस लागवडीवर संकट! उष्णतेमुळे शेतकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय
Web Summary : Maharashtra government announces new cotton farming plan for 2026 to combat pink bollworm. Cotton seeds available after May 15th, planting after June 1st with 100mm rainfall advised. This aims to minimize losses experienced in previous years.
Web Summary : महाराष्ट्र सरकार ने गुलाबी bollworm से निपटने के लिए 2026 के लिए कपास की खेती की नई योजना की घोषणा की। कपास के बीज 15 मई के बाद उपलब्ध, 100 मिमी वर्षा के साथ 1 जून के बाद रोपण की सलाह दी गई। इसका उद्देश्य पिछले वर्षों में हुए नुकसान को कम करना है।