Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी 672 कोटींची भांडवली मदत; वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 20:35 IST

Nashik Jilha Bank : गेल्या काही वर्षांत बँकेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला असला तरी तिचे मूलभूत महत्त्व अबाधित राहिले आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रमुख आधारस्तंभ संस्था असून, शेतकरी व कृषीपूरक प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यामध्ये तिची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. प्राथमिक कृषी पतसंस्थांना व्यापक बँकिंग व्यवस्थेशी जोडत तळागाळापर्यंत संस्थात्मक कर्ज पोहोचविण्यात बँकेने मोठे योगदान दिले आहे. 

यामुळे ग्रामीण उपजीविका सक्षम होत स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. जिल्ह्यातील सामाजिक-आर्थिक स्थैर्यासाठी शेती अत्यंत महत्त्वाची असताना, सहकारी बँकिंगची भूमिका अधिकच निर्णायक ठरते. गेल्या काही वर्षांत बँकेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला असला तरी तिचे मूलभूत महत्त्व अबाधित राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा धोरणात्मक युनिटच्या सहकार्याने बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वसमावेशक धोरण आखण्यात आले आहे. या धोरणाद्वारे नियामक नियमांचे पालन सुनिश्चित करत बँकेची आर्थिक स्थिरता पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, राज्य शासनाने ३० मार्च २०२६ रोजी ६७२ कोटी रुपयांच्या भांडवली मदतीस मान्यता दिली आहे. या भांडवली गुंतवणुकीमुळे बँकेसमोरील जुन्या अडचणी दूर करून आर्थिक स्थिती मजबूत करण्यास आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षांनुसार कामकाज पुन्हा सुरळीत करण्यास मोठी मदत होणार आहे.

तथापि, पुढील वाटचाल आशादायी असली तरी ठोस अंमलबजावणी, वेळोवेळी आवश्यक सुधारणा आणि शिस्तबद्ध कामकाज यांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाचा ठाम पाठिंबा व स्पष्ट धोरणात्मक दिशा यामुळे बँक पुन्हा सक्षम होऊन भविष्योन्मुख संस्था म्हणून उभी राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

बँकेच्या पुनरुज्जीवनामुळे शेतकऱ्यांना अधिक सक्षम वित्तीय मदत मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासातही याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Bank to Receive ₹672 Crore Boost: Details Inside

Web Summary : Nashik District Central Cooperative Bank receives ₹672 crore aid, revitalizing rural economy. This investment aims to strengthen the bank's financial stability and support farmers, fostering comprehensive development in Nashik.
टॅग्स :शेती क्षेत्रनाशिकबँकशेतकरी