Bogus Pik Vima : बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२४ मध्ये अतिवृष्टी, गारपीट आणि रोगराईमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीवर भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे तब्बल ७.५८ लाख तक्रारी दाखल केल्या. (Bogus Pik Vima)
मात्र, त्यातील केवळ ३.८ लाख तक्रारींचेच पंचनामे करण्यात आले असून उर्वरित ३.७८ लाख तक्रारी दुर्लक्षित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Bogus Pik Vima)
या प्रकरणावर जिल्हा स्थायी समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत आमदारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी बोगस सर्व्हे व एकतर्फी पंचनाम्यांची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी विमा कंपनीच्या जिल्हा समन्वयकांनीही हा प्रकार मान्य करत, सर्व तक्रारींचे पंचनामे झाले नसल्याची कबुली दिली. (Bogus Pik Vima)
कृषी विभागाला डावलून पंचनामे!
नियमाप्रमाणे शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर पंचनामा करताना कृषी अधिकारी, विमा कंपनीचा प्रतिनिधी आणि संबंधित शेतकरी तिघांचाही उपस्थिती आवश्यक असतो. मात्र, अनेक ठिकाणी फक्त विमा प्रतिनिधींनीच एकतर्फी सर्वेक्षण केल्याचे उघड झाले आहे. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनीही सभागृहात सविस्तर माहिती दिली.
शेतकऱ्यांची फसवणूक
या बोगस सर्वेक्षणामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे जिल्हाभरात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून त्यांनी यापूर्वीही याविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन केली होती. मात्र त्यानंतरही योग्य कार्यवाही न झाल्याने शेतकरी अजूनही भरपाईपासून दूर आहेत.
या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता आता जिल्ह्यातील प्रत्येक आमदार आणि पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचे आदेश दिले गेले आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रारींवर थेट चर्चा होणार असून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.