नागपूर : अलीकडे धानाच्या राेवणीसाठी (Paddy Farming) मजुरांची माेठी कमतरता भासते. त्यातच मजुरीवर प्रतिएकर किमान पाच हजार रुपये खर्च करावे लागले. यावर उपाय म्हणून मशीनद्वारे राेवणी करणे, कमी वेळ व खर्चाचे काम असल्याचे प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बाेरडा (ता. रामटेक) शिवारात या प्रात्यक्षिकाचे आयाेजन करून मशीनद्वारे धानाची राेवणी करण्यात आली. यंत्राद्वारे राेवणी केल्यास मजुरीच्या खर्चाच्या ७० टक्के बचत हाेत असल्याचे शेतकरी गटाचे अध्यक्ष प्रतीक ठाकूर यांनी सांगितले.
बोरडा येथील सक्षम शेतकरी स्वयंसाहाय्यता गटाचे सदस्य सुरेंद्र धारणे यांच्या शेतात यंत्राद्वारे धानाची राेवणी प्रात्यक्षिक पार पडले. प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे नियोजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राजेश दोनोडे यांनी केले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी ग्रीष्मा डेहणे, तालुका कृषी अधिकारी जितेंद्र दमाहे, जयश्री उमाळे, तंत्र अधिकारी विवेक गजभिये, वाघमारे, बंडू पाटील, गटाचे अध्यक्ष प्रतीक ठाकूर यांच्यासह धान उत्पादक शेतकरी उपस्थित हाेते. आत्मा व कृषी विभागाद्वारे ५० प्रात्यक्षिके, ५० एकरांत ५० शेतकऱ्यांच्या शेतात घेण्यात येत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळावे आणि शेतीत यांत्रिकीकरणाचा प्रसार व्हावा, यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेला राज्य कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी भेट दिली. कार्यशाळेत शेतकऱ्यांना अधिक उत्पादनासाठी योग्य वाणांची निवड, पीएफओसंदर्भातील अडचणी, तसेच उत्पन्न दुप्पट करण्याचे मार्ग यावर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय, मजुरांची टंचाई व वाढता खर्च लक्षात घेता, यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून वेळ आणि पैसा कसा वाचवता येईल, यावरही भर देण्यात आला.