जळगाव : केंद्र शासनाच्या बागायती विकास मंडळामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 'केळी समूह' हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम लागवडीपासून ते निर्यातीपर्यंतचा प्रवास (Banana Farming) सोपा करण्यासह उत्पादकांना स्थिर दर, आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार आणि नवीन बाजारपेठांचा लाभ मिळवून देणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने दोन वर्षांचा कृती आराखडा हाती घेतला आहे.
या प्रकल्पांतर्गत जळगावमधील केळी लागवडीत (Keli Lagvad) जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यासाठी ऊतकसंवर्धन प्रयोगशाळा, मृदा व पान विश्लेषण प्रयोगशाळा तसेच कीड व पोषण व्यवस्थापन सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने आणि नियोजनबद्ध लागवड करण्यास प्रोत्साहन मिळेल.
शेतकरी उत्पादक संघटनांना उपक्रमामुळे बळकटी मिळून सामूहिक ताकद वाढणार आहे. पारदर्शक व्यापार, न्याय्य दर, नियोजित साठवणूक व मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पामागे आहे.
या योजनांतर्गत शेतकऱ्यांना लागवड ते निर्यात या संपूर्ण प्रक्रियेत सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने केंद्रीय यंत्रणांनी सातत्याने समन्वय साधला जात आहे.- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी
थेट १५ बाजारपेठेत संधीशेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा यासाठी १५ थेट बाजारपेठा, २० किरकोळ दुकाने तसेच निर्यातीसाठी थंड वाहतूक साखळी व रेफ्रिजरेटेड ट्रान्सपोर्टची सोय उभारण्यात येणार आहे. शिवाय प्रक्रिया केंद्रे, पक्वगृहे, पॅकगृहे, मृदा व पान विश्लेषण व ऊतकसंवर्धन प्रयोगशाळेसह ५० हून अधिक सुविधा निर्माण होणार असून, या माध्यमातून शेकडो रोजगार उपलब्ध होणार आहेत.
दोन वर्षांत होतील अशा सुविधा उपलब्धपहिले वर्ष : लागवड क्षेत्रवाढ, यांत्रिकीकरण, एकात्मिक पोषण व कीड व्यवस्थापन, शेतकरी प्रशिक्षणावर भर.दुसरे वर्ष : हंगामोत्तर व्यवस्थापन जसे की पॅक हाऊस, प्रक्रिया केंद्रे, शीतगृह साखळी, फळ पिकवणी चेंबर सह अन्य सुविधांची उभारणी.