Join us

Banana Cluster : जळगाव जिल्ह्यात केळी क्लस्टर आवश्यक, कारण.... वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 18:51 IST

Agriculture News : देशातील प्रमुख बनाना क्लस्टरपैकी जळगाव जिल्ह्यातही बनाना क्लस्टर आवश्यक आहे, कारण..

जळगाव : 'देशभरात जळगाव (Jalgaon) हा प्रमुख केळी उत्पादकांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या परिसरातच बडवाणी, बुऱ्हाणपूर, नंदुरबार, धुळे, सुरत, नर्मदानगर आदी जिल्ह्यांतील केळी उत्पादकांवर (Banana Farmers) आधारित अर्थव्यवस्था आहे. त्या दृष्टीने देशातील प्रमुख बनाना क्लस्टरपैकी जळगाव जिल्ह्यातही बनाना क्लस्टर असावे, यासाठी विशेष अहवाल तयार करून स्वतः केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू,' असे आश्वासन 'अपेडा'चे अध्यक्ष अभिषेक देव यांनी दिले आहे.

ऍग्रीकल्चर प्रोसेस फूड प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (अपेडा) (APEDA) व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.तर्फे कस्तुरबा सभागृह येथे आयोजित 'बनाना ग्रोवर्स अँड एक्सपोर्ट मीट २०२४-२५' मध्ये प्रमुख अतिथी म्हणून अभिषेक देव बोलत होते. व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अपेडाचे व्यवस्थापक विनिता सुधांशु, महाराष्ट्र अपेडाचे प्रशांत वाघमारे, केळी उत्पादक संघाचे वसंत महाजन, अमोल जावळे, केळी निर्यातदारांपैकी आशिष अग्रवाल, किरण ढोके, केळीतज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

केळीची निर्यात एक बिलियनच्यावर पोहोचण्याबाबत झाली चर्चा... केळीची गुणवत्ता आणि उत्पादनात भारत देश अग्रस्थानी आहे. जागतिक स्तरावर भारताचा निर्यात वाटा एक टक्क्यापेक्षा कमी आहे. प्रमुख निर्यातदार देशांमध्ये आपण १८व्या क्रमांकावर आहोत. आपल्यापेक्षा लहान देश निर्यातीत पुढे आहेत. गेल्या वर्षांची भारताची केळी निर्यात २९०.९ मिलियन डॉलर्स होती. केळीची निर्यात एक बिलियनच्या वर कशी होईल, याबाबतची चर्चा जैन हिल्स येथे झालेल्या अपेडा केळी उत्पादक व निर्यातदार यांच्यासमवेतच्या बैठकीत झाली. यासाठी पायाभूत सुविधांसह फुटकेअर मॅनेजमेंटसाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, पॅक हाऊस, कोल्ड स्टोअरेज, शेतातून पॅक हाऊस- पर्यंत सुरक्षित, जलद व कमी किमतीत वाहतूक सुविधा निर्माण करण्याविषयीसुद्धा चर्चा झाली.

स्वतंत्र केळी मिशन कार्यक्रम 'अपेडा'चे व्यवस्थापक विनिता सुधांशू यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, 'महाराष्ट्रातील शेतकरी हा तंत्रज्ञान आत्मसात करण्यात अग्रस्थानी आहे. त्यातून उत्पन्नवाढीसाठी ते प्रयत्न करतात. केळीमध्ये गेल्या दहा वर्षात निर्यातीचा वाटा वाढला आहे. भविष्यात निर्यातवाढ- विण्यासाठी स्वतंत्र केळी मिशन कार्यक्रम आखण्यात यावा, अशीही इच्छा विनिता सुधांशू यांनी व्यक्त केली. यावेळी अनिल जैन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :जळगावकेळीशेतीशेती क्षेत्र