Bail Pola : पोळा दोन दिवसांवर येऊन ठेपला असून बळीराजाकडून farmer) सणाची तयारी सुरु आहे. मात्र जनावरांसाठी जीवघेणा ठरणारा लंपी हा आजार सध्या राज्यातील बहुतांश भागात सुरु आहे. परिणामी यंदाचा पोळा साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिवाळीसारखा (Bail Pola) सण. मात्र यंदा पोळ्यावर लंपीचे सावट आहे. कारण गेल्या महिनाभरापासून लंपीची साथ पसरते आहे. परिणामी पोळ्याच्या निमित्ताने बैलजोड्या एकत्र येऊन सण साजरा करत असतात. अशावेळी लंपीची लागण इतर निरोगी जनावरांना होण्याची शक्यता आहे. म्हणून पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लम्पी आजारामुळे यंदाचा पोळा सण घरगुती पद्धतीनेच साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी या बाबीचे गांभीर्य ओळखून आपापल्या घरीच बैलपूजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. अनेक जनावरे एकत्र आल्यास लम्पी रोग पसरण्याचा धोका अधिक वाढतो. याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे.
शेतकरी व पशुपालकांनी घरच्या घरीच साध्या व सुरक्षित पद्धतीने साजरा करावा. आपल्या सर्वांच्या सहभागातूनच जनावरांचे आरोग्य जपले जाईल. लम्पीचा संसर्ग रोखणे ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे पोळा हा सण घरगुती वातावरणात, सुरक्षिततेची काळजी घेऊन साजरा करावा, असे आवाहन केले आहे.