Crop Damage : नाशिक जिल्ह्यात (Nashik District) गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ३४३ गावांतील ८ हजार ६४१ शेतकऱ्यांना फटका बसला असून १ हजार ९३० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. यात कांदा, गहू, टोमॅटो, भाजीपाला या पिकांसह द्राक्षे, आंबा, डाळिंब या फळबागांचे नुकसान झाले आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका सुरगाणा तालुक्याला बसला आहे.
सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) १४१ गावे बाधित झाले असून ३ हजार ८४४ शेतकऱ्यांचे ५०३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. जिल्ह्याच्या काही तालुक्यांत गारपीट (Unseasonal Rain) देखील झाल्याने नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला देखील जिल्ह्यातील काही तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता.
वातावरणात बदल होऊन ऐन उन्हाळ्यात कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कृषी विभागाने पंचनाम्याचे काम हाती घेतले असल्याचे प्रभारी जिल्हा अधीक्षक अभिमन्यू काशिद यांनी सांगितले.
आंबा, कांदा पिकांचे नुकसानजिल्ह्यातील ७९५ हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. तर ३३२ हेक्टरवरील भाजीपाला मातीमोल झाला. ६९५ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. ५२४ हेक्टरवरील आंब्याच्या फळबागांचे नुकसान झाले आहे. कांद्यासोबत आंबा पिकाचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व होत असलेली कैरी झाडावरून गळून पडली.
२९९ घरांची झाली पडझडअवकाळीमुळे जिल्ह्यातील २९९ घरांची पडझड झाली आहे. यात पेठ तालुक्यातील सर्वाधिक १०१ घरांची पडझड झाली आहे. त्याखालोखाल कळवण तालुक्यातील ५९, बागलाण तालुक्यातील २२ मालेगाव तालुक्यातील २१ घरांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे एका कांदाचाळ, दोन शाळा व एका प्राथमिक आरोग्य केंद्राचे नुकसान झाले आहे.