Farmer Loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 'जनसमर्थ' पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून घरबसल्या अर्ज करता येईल, ज्यामुळे वेळ, खर्च आणि श्रम वाचणार असून, कर्ज प्रक्रियेला वेग आणि पारदर्शकता मिळेल.
जनसमर्थ पोर्टलवर करा ऑनलाइन अर्ज
शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी जनसमर्थ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. या पोर्टलवर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करता येतो.
शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड!
योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. त्याद्वारे पीक लागवड, खते, बियाणे, कीटकनाशके तसेच इतर शेतीविषयक गरजांसाठी सहज कर्ज उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळेल.
पात्रता आणि अटी
अर्जदार शेतकरी राज्य किंवा केंद्र शासनाच्या नोंदणीत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. फार्मर आयडी, आधार कार्ड व आधारशी संलग्न मोबाइल क्रमांक असणे बंधनकारक आहे. अर्जदाराचे बँक खाते सक्रिय असावे, तसेच शेतीसाठी वैध जमीनधारणा किंवा लागवडीचा पुरावा असणे आवश्यक आहे. कर्जाचा वापर फक्त शेतीसंबंधित कामांसाठी करणे अपेक्षित आहे.
कुठे आणि कसा करायचा अर्ज ?
शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज जनसमर्थ ऑनलाइन पोर्टल (https://jansamarth.nabard.org/) द्वारे करावा. पोर्टलवर लॉगिन करून शेतकऱ्यांना आपली वैयक्तिक माहिती, शेती व जमिनीसंबंधी माहिती भरून अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सबमिट केल्यानंतर संबंधित राष्ट्रीयीकृत बँकांकडून पडताळणी करून कर्ज मंजूर केले जाते. त्यामुळे आता पीक कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लागणार नाहीत
