Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्याही खात्यावर जास्तीचे अनुदान आले, तर पहिल्यांदा हे काम करा, कारण.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:10 IST

Agriculture News : अनुदान प्रकरणात तातडीने लक्ष घालून केलेल्या चौकशीत तलाठ्यांकडून झालेली चूक ही हेतुपुरस्सर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव : पिंपळगाव खुर्द येथील अनुदान वाटपात झालेल्या चुकांमुळे ४७ शेतकऱ्यांना शासन अहवालापेक्षा जास्त अनुदान वितरित झाल्याचे उघडकीस आले. यापैकी आतापर्यंत केवळ तीन शेतकऱ्यांनी वाढीव रकमेचा परतावा जमा केला आहे. उर्वरित ४४ शेतकऱ्यांकडून वाढीव अनुदानाची वसुली सामंजस्याने करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

याप्रकरणामुळे उर्वरित सुमारे ५७० लाभार्थी शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील की काय, अशी भीती शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, सोनू परदेशी यांनी तहसीलदार, तलाठी व संबंधित अधिकाऱ्याकडे संपर्क साधल्यानंतर त्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करत परिस्थितीचा आढावा घेतला आणि या गोंधळावर तोडगा काढला.

यासंदर्भात तलाठी बबन मंडले यांनी सांगितले की, एकूण ५७० लाभार्थी असले तरी प्रत्यक्षात अनुदान वाटपातील चूक केवळ ९४ शेतकऱ्यांच्या बाबतीत झाली होती. त्यापैकी ४७ शेतकऱ्यांना जास्त, तर ४७ शेतकऱ्यांना कमी अनुदान वितरित झाले होते. जास्त अनुदान मिळालेल्या शेतकऱ्यांकडून वाढीव रकमेचा परतावा स्वेच्छेने घेतला जात असून ही वसुली पूर्ण केली जाणार असल्याचे बबन मंडले यांनी स्पष्ट केले.

अनेक शेतकऱ्यांना ऑगस्टपासून अनुदान नाहीअनेक शेतकऱ्यांना अद्याप शासनाकडून ऑगस्ट महिन्यापासून अनुदान प्राप्त झालेले नाही. काही शेतकऱ्यांची प्रतिज्ञापत्रे अपूर्ण आहेत, तर काहींची बँक खाती बंद किंवा लाभार्थी मयत आहेत. बैंक पासबुक, आधार कार्ड व संमतीपत्रे सादर केली आहेत, अशांना अनुदान वाटप करण्यात आले आहे.

वाढीव अनुदान प्रकरणात तातडीने लक्ष घालून केलेल्या चौकशीत तलाठ्यांकडून झालेली चूक ही हेतुपुरस्सर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फेरपडताळणीत तफावत लक्षात येताच संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, जास्त रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांकडून परतावा घेण्यासाठी प्रशासनाकडून समन्वयाने कार्यवाही सुरू आहे.- विजय बनसोडे, तहसीलदार, पाचोरा 

English
हिंदी सारांश
Web Title : Received extra subsidy? Act fast to avoid complications!

Web Summary : Jalgaon farmers received excess subsidies due to errors. Most haven't returned it. Some haven't received subsidies since August due to incomplete paperwork. Officials are rectifying errors and recovering excess funds amicably.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीक कर्जकृषी योजना