- सुभाष गरपडे महाराष्ट्रात बहुतांश भात उत्पादक (Paddy Farmer) जिल्हे आहेत. यात प्रामुख्याने विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यांचा समावेश होतो. एकट्या भंडारा जिल्ह्यात सुमारे दोन लाख ७० हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली आहे. भात पिकाच्या कापणीनंतर शेतात उरलेले 'तणस' शेतकरी केवळ पशुधनाच्या चाऱ्यासाठी (Fodder Production) आणि थोड्याफार प्रमाणात खतासाठी वापरले जाते. मात्र उर्वरित तणसाचे काय? असा प्रश्न कायम अनुत्तरित राहतो.
दरम्यान महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही (Nashik district) मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पादन घेतले जाते. भात पिकातून निघणारे बहुतांश तणस जनावरांसाठी वापरले जाते. मात्र उर्वरित ताणास पेटवून दिले जाते. परिणामी या तणसावर प्रक्रिया होणे गरजेचे असून जेणेकरून शेतकऱ्याना त्याचा आर्थिक फायदा होईल. महाराष्ट्रात प्रक्रिया उद्योग उभा राहणे आवश्यक आहे. केवळ भंडारा २०१९ मध्ये जिल्ह्यात १५०० कोटी रुपये खर्चाचे १०० एकर जमिनीवर तणसापासून इथेनॉल व बायोगॅस निर्मिती प्रकल्प तयार होणार असल्याचे सांगितले होते. परंतु अद्यापही सदर प्रकल्प निर्मितीबाबत जिल्ह्यात कुठल्याही हालचाली दिसून येत नाहीत.
धानाच्या किंवा भाताच्या तणसीपासून व बांबूपासून तयार होणाऱ्या पांढऱ्या शुभ्र कागदाची निर्मिती करणारा तुमसर तालुक्यातील देव्हाडा (खुर्द) येथील एलोरा पेपर मिल गेल्या २० ते २२ वर्षांपासून राजकीय इच्छाशक्ती अभावी बंद पडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुण मोठ्या प्रमाणात रोजगारापासून वंचित झाले आहेत. त्यामुळे यावर आधारित उद्योग असणे आवश्यक आहे.
आर्थिक व तांत्रिक सहाय्यतणसावर आधारित उद्योग धंद्यांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध आहेत. तणसापासून सूक्ष्म खाद्य उत्पादने तयार करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना असून, याद्वारे शासनाकडून उद्योगांना आर्थिक व तांत्रिक सहाय्य प्रदान केले जाते. तणसावर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी प्रधानमंत्री सृजन कार्यक्रमाद्वारे वित्तीय सहाय्य दिले जाते.
बायोमास प्लांटमध्ये वापरतणसाचा उपयोग प्लास्टिकला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक बायोडिझेल प्लेटस, कप आणि पॅकिंग मटेरियल तयार करता येऊ शकतो. तणस जाळल्यानंतर मिळणाऱ्या राखेचा सिमेंट, वीट आणि बांधकाम साहित्य निर्मितीमध्येसुद्धा उपयोग आहे. भाताच्या तणसापासून टोपल्या, मडके आणि शोभेच्या वस्तू तयार करता येऊ शकतात. ऊर्जा उत्पादनामध्ये बायोमास प्लांटमध्ये भाताच्या तणसाचा वापर केला जातो. त्यानंतरही त्याचा अन्य उत्पादनातही वापर होत असतो.
अन्य मंडळांना मदततणसापासून कागद, हस्तकला व इतर उत्पादनासाठी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ मदत करते. तणसापासून अन्न उत्पादने तयार करण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय आर्थिक, तांत्रिक व परवानासाठी मदत करते. राष्ट्रीय बायोगॅस मिशनअंतर्गत तणसाचा वापर करून ऊर्जा उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांना वित्तीय सहाय्य केले जाते.