Join us

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा पोर्टलवरून सुतारकाम कारागिरांचा पर्यायच वगळला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:55 IST

PM Vishwakarma : कारागिरांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी सरकारद्वारे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे.

PM Vishwakarma : भारतातील कारागीर समाजाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी सरकारद्वारे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ सुरू करण्यात आली आहे. ही योजना कारागीरांना (Car Pentar) कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत प्रदान करते. मात्र सद्यस्थितीत पीएम विश्वकर्मा पोर्टलवर (PM Vishwakarma Portal) सुतारकाम करणाऱ्यांसाठी कारपेंटर हा पर्यायच काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी तक्रारी केल्यानंतर पुन्हा समाविष्ट करण्यात आला आहे. 

केंद्र सरकारने पारंपरिक व लघू उद्योग तसेच वेगवेगळे पारंपरिक व्यवसाय तसेच कारागिरांना चालना देण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Scheme) सुरू केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण ऑनलाइन आहे. ही सुविधा सीएससी केंद्रामार्फत राबविली जात असून अनेकांनी या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेतला आहे. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट ग्रामपंचायतमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये जमा करून काही दिवसांनी त्याचे प्रशिक्षण दिले जाते.

प्रशिक्षणानंतर रक्कम बँक खात्यात जमाप्रशिक्षण झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाते. त्याला परंपरेनुसार उद्योग करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत १ लाख रुपये कर्ज म्हणून देण्यात येते. बऱ्याच कारागिरांनी याचा लाभ घेतला आहे. मात्र काही दिवसापासून ऑनलाइन प्रक्रियेमधून कारपेंटर या व्यवसायाला बाद करण्यात आले आहे. सरकारने त्यामध्ये लक्ष घालून कारपेंटर हा पर्याय ऑनलाइन उपलब्ध करून  देण्यात यावा, अशी मागणी सुतार बांधवांकडून करण्यात आली होती. 

सुतारकाम हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र पीएम विश्वकर्मा योजनेतून त्याला वगळण्यात आले आहे. संबंधितांनी पुन्हा एकदा सुतार कामाला या योजनेत स्थान द्यावे. त्यामुळे कारागिरांना त्याचा लाभ घेता येईल.- संतोष निमगडे, अध्यक्ष, विश्वधराय बहुद्देशीय संस्था.

अर्ज करण्यासाठी सीएससी केंद्रावर गेलो. मात्र अर्ज करताच आला नाही. सीएससी केंद्रचालकाने दुसरा पर्याय निवडण्यास सांगितले. मात्र गेल्या २० वर्षांपासून हेच काम करत आहे. हा व्यवसायच या प्रक्रियेतून वगळल्याने योजनेपासून वंचित राहावे लागले आहे.- जितेंद्र मिस्त्री, सुतार, कारागीर

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीशेतकरी