Join us

Agriculture News : नाशिकचा कादवा साखर कारखाना शासनाच्या थकहमीविनाच, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 13:30 IST

Agriculture News : महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना म्हणून नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील कादवा कारखान्याची ओळख आहे.

नाशिक : राज्यातील ११ साखर कारखान्यांना (Sugar Factory) १,५९० कोटी १६ लाख रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील आठवड्यातच घेतला. पहिल्या यादीत १३ कारखान्यांना १,८९८ कोटी रुपयांची थकहमी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे . मात्र यात नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य कादवा सहकारी साखर कारखान्याचा समावेश नसल्याचे दिसून आले. 

महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना म्हणून नाशिकच्या (Nashik) दिंडोरी तालुक्यातील कादवा कारखान्याची ओळख आहे. कर्मवीर कै. राजाराम सखाराम वाघ यांनी या कारखान्याची सुरुवात केलीय. या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम 1978 साली सुरू झाला. या कारखान्यासाठी कच्चा माल म्हणजेच ऊस दिंडोरी, निफाड, नाशिक, कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उपलब्ध होतो. 

यंदा कादवा कारखान्याचे १४० दिवसांचे ऊस गाळपाचे उद्दिष्टही पूर्ण केले होते. २५ हजार मेट्रिक टन गाळप क्षमता कारखान्याची असून, सर्वाधिक गाळप याच कारखान्याचे झाले होते. दरम्यान आर्थिक अडचणीत आलेल्या कारखान्यांना राष्ट्रीय सहकार निगमकडून कर्ज देण्यात येते. मात्र, या कर्जासाठी राज्य सरकारची थकहमी आवश्यक असते. मात्र कादवा साखर कारखान्याची आर्थिक स्थिती व व्यवहार चोख असल्याने कारखान्याला शासनाच्या थकहमीची गरज नसल्याचे कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले. 

शासनाने थकहमी नाकारली? 

दरम्यान कादवा कारखान्याची कर्ज परतफेड नियमित असून, राज्य सहकारी बँकेचे मालतारण कर्ज व इथेनॉल प्रकल्पासाठी कारखान्याचे कर्ज घेतले आहे. त्यात आता नवीन हंगामासाठीदेखील कारखान्याचे कर्ज घेतले असून, कर्जफेड नियमित आहे. त्यामुळे शासनाने कारखान्याला थकहमी नाकारल्याची चर्चा आहे.

टॅग्स :नाशिकशेती क्षेत्रशेतीसाखर कारखानेऊस