Join us
Daily Top 2Weekly Top 5

युरिया गोणीची अधिकृत रक्कम 266 रुपये, मात्र या शेतकऱ्यांकडून तब्बल 530 रुपयांची वसुली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:11 IST

Agriculture News : शेतकऱ्यांना एका युरिया गोणीसाठी तब्बल ५३० रुपये मोजावे लागत असून हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची उघड लूट

- गणेश शेवरे पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरासह परिसरात युरिया खताच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असून, शेतकऱ्यांची सर्रास आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे. शासनाने युरियाची अधिकृत किंमत २६६ रुपये निश्चित केलेली असताना, काही खत व औषध विक्रेते एका युरियाच्या गोणीसाठी ३०० रुपये किंवा त्याहून अधिक दर आकारत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. 

ही दरवाढ ट्रान्सपोर्ट व हमाली शुल्काच्या नावाखाली केली जात असल्याचे संबंधित विक्रेते सांगतात; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप आहे. युरिया खरेदी करताना शेतकऱ्यांना नॅनो युरिया अथवा इतर खत व औषधे बळजबरीने खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. नॅनो युरिया घेणे बंधनकारक नसतानाही “युरियाला लिंकिंग आहे” असे सांगत प्रत्येकी २३० रुपये दराने नॅनो युरिया शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे. 

अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, एक किंवा चार गोण्या युरिया घेतल्यास एक ते दोनच नॅनो युरिया बाटल्यांची गरज असते; मात्र विक्रेते चार बाटल्या किंवा अनावश्यक औषधे जबरदस्तीने देतात. यास विरोध केल्यास “युरिया शिल्लक नाही” असे सांगून थेट विक्री नाकारली जाते.

यामुळे शेतकऱ्यांना एका युरिया गोणीसाठी तब्बल ५३० रुपये मोजावे लागत असून हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची उघड लूट असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. शिवाय काही विक्रेते जाणून-बुजून रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

सध्या रब्बी हंगाम सुरू असून मका, गहू, ज्वारी, बाजरी तसेच कुंपणावरील पिकांसाठी युरिया अत्यंत गरजेचा आहे. पिकांची वाढ, दर्जा आणि उत्पादन वाढवण्यासाठी युरियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे युरियाची मागणी प्रचंड असताना हा गैरप्रकार शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक वाढवत आहे.

पिंपळगाव बसवंत हे ‘मिनी दुबई’ आणि परिसरातील शेकडो गावांसाठी महत्त्वाची कृषी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. मात्र याच ठिकाणी रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र संतापाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवून लुटमार करणाऱ्या  विक्रेत्यांवर  तात्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

“युरिया २६६ रुपयांना मिळायला हवा, पण आम्हाला ३०० रुपये मोजावे लागतात. शिवाय इतर औषधे जबरदस्तीने घ्यायला लावतात. आवाज उठवला तर युरिया देत नाहीत. प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी.”- स्वप्निल निरगुडे, शेतकरी 

“युरिया विक्रीत दरवाढ किंवा बळजबरीने अन्य औषधे खते  विकली जात असल्यास किंवा तसे आढळल्यास संबंधित औषध विक्रेत्यावर   नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.”- राहुल धनगर, तालुका कृषी निरीक्षक 

खत अनुदान धोरणातील त्रुटी.....युरिया खताच्या विक्रीत सुरू असलेले गैरप्रकार हे खत अनुदान धोरणातील त्रुटींचे परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. केंद्र सरकारचा खत अनुदानावर सुमारे 2.4 लाख कोटी रुपयांचा वार्षिक खर्च होत असून, युरिया अतिशय स्वस्त असल्याने त्याचा अतिवापर केला जातो. परिणामी नायट्रोजनचा वापर वाढून फॉस्फरस व पोटॅश खतांचा वापर घटतो.

उधारीवर खते घेणाऱ्या शेतकऱ्यांची कोंडीअनेक शेतकरी आर्थिक अडचणीमुळे खते व औषधे उधारीवर घेतात. अशा शेतकऱ्यांकडे विरोध करण्याची ताकद नसल्याने औषध दुकानदार जे देतील ते घेण्याची त्यांना बळजबरी होते. नको असलेली औषधे, नॅनो युरिया किंवा अतिरिक्त खते घ्यावी लागल्याने आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी अजून कर्जाच्या गर्तेत जातो. या गैरप्रकारांमुळे शेती करणे अधिक अवघड होत असून आर्थिक शोषणाला सर्वाधिक बळी हे उधारीवरील शेतकरी ठरत असल्याचे चित्र आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers Exploited: Urea Sold at Double the Official Price.

Web Summary : Farmers in Pimpalgaon Baswant are being overcharged for urea, paying ₹530 instead of the official ₹266. Retailers force unwanted nano urea purchases, threatening denial of urea if farmers refuse. This exploitation, coupled with artificial shortages, intensifies farmer distress during the crucial Rabi season.
टॅग्स :खतेशेती क्षेत्रशेतीशेतकरीनाशिक